संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश; सायबरच्या IG ना निर्देश
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर इंग्रजीत आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. यासंदर्भात, आपण सायबरच्या आयजींना सांगितलं आहे.

मुंबई : अभिनेता विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छावा चित्रपट सध्या बॉलिवूड विश्वात धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा या सिनेमाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर साकारण्यात आली असून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे. सिनेमातील अनेक सीन अंगावर शहारे आणणारे आहेत, तर काही सीन्स पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही दिसून येतं. त्यातच, उद्या 19 फ्रेबुवारी रोजी छपत्रती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असून 'छावा' (Chhhaava) चित्रपटामुळे देखील संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा अभिमानाने आणि तितक्याच संवेदनेनं समोर येत आहे. मात्र, इंटरनेट विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटविण्याची मागणी केली जात आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर इंग्रजीत आक्षेपार्ह लिखाण केलेलं आहे. यासंदर्भात, आपण सायबरच्या आयजींना सांगितलं आहे. तसेच, विकिपीडियावर संपर्क करत याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आपल्याला कल्पना आहे की विकिपीडीया हे भारतातून संचालित होत नाही, त्यांचे नियम आहेत. यासंदर्भातील एडिटोरीयल राईट्स कोणाकडे असतात हे पाहिलं जाईल. ऐतिहासिक गोष्टी तोडून मोडून करण्यापेक्षा नियमावली तयार करा, अशा सूचना आपण देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माध्यमांची भौगोलिक रचना होती, मात्र आता समाज माध्यमामुळे ती नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणीही घाला घालू शकत नाही. यासंदर्भात नियमावली तयार करता येईल का? याचा विचार सुरू आहे. दरम्यान, विकिपीडियातील मजकूरसंदर्भात कारवाई केली जाईल, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
छत्रपति संभाजी महाराज इनको लेकर विकिपीडिया पर लिखी गई विवादित बातों का हम निषेध करते हैं, राज्य सरकार ने आईजी साइबर को विकिपीडिया से बात कर विवादित बातों को हटाकर सही जानकारी प्रेषित करने का आदेश दिया है।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 18, 2025
(मीडिया से संवाद | मुंबई | 18-2-2025)#Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/YRZwOD7hDR
डान्सबार धोरणासंदर्भात मांडली भूमिका
काही लोकं आपला अजेंडा चालवत आहेत, कॅबिनेटचा अजेंडा गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे. कॅबिनेटच्या आधी अजेंडा दाखवत आहेत. आपल्या खपासाठी नियम मोडू नका, असे म्हणत डान्सबार संबंधित विचाराधीन निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना लक्ष्य केलं.
आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ
कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या बेकायदा घरासंदर्भात मी स्वत:बैठक घेतो आहे. गरजू लोकांना कसं वाचवतां येईल यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ. आमदार रविंद्र चव्हाण यांनीदेखील ही घटना लक्षात आणून दिली आहे. तसेच, बिल्डरवर कारवाई करा असे पोलिसांना सांगितलं आहे. जे जेन्युईन बायर्स आहेत, त्याला कोर्टात जात कसं नियमित करायचं हा प्रश्न आहे. काही इमारती सरकारी जागेवर बांधल्या आहेत, असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कल्याण डोंबिवलीत अनिमियत घरांच्या पाडकामाबाबत दिले.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष
वैद्यकीय कक्ष मी पण चालवायचो, त्यात चुकीचं काही नाही. उपमुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर काहीही गैर नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षासंदर्भा कुठलाही वाद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचवलं आहे.

























