माचिसची काडी लावायची अन् पळून जायचं, वस्तुस्थिती झोंबतेय; आरएसएस मुख्यालयाच्या कुलूपाला हात लावून दाखवा म्हणणाऱ्या जोशींवर वडेट्टीवार संतापले
Vijay Wadettiwar on Sandeep Joshi : संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावून दाखवावा. आम्ही इथेच आहोत, असे वक्तव्य भाजपचे संदीप जोशी यांनी केले होते.

Vijay Wadettiwar on Sandeep Joshi : नागपूरमधील दंगलीनंतर हा हिंसाचार (Nagpur Violence) आपल्या घरापर्यंत पोहोचेल, या भीतीमुळे भाजपने औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर माघार घेतली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना भाजप आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी सपकाळांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावायची हिंमत कोणाच्याही %$मध्ये नाही, हर्षवर्धन सपकाळांच्या #$मध्ये दम असेल, तर त्यांनी येथे येऊन संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावून दाखवावा. आम्ही इथेच आहोत, नागपूरची दंगल केवळ चार तासांत नियंत्रणात आणली गेली. ही दंगल कोणी आणि कशासाठी घडवली, हे सर्वांना ठाऊक आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करण्याऐवजी खरी सद्भावना दाखवावी," असे त्यांनी म्हटले होते. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संदीप जोशी यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, उलटा चोर कोतवाल को डांटे, नागपुरात काय झालं हे सर्वांनी पाहिलं. चादर जाळली नसती तर नागपूर अशांत झाला नसता. माचीसची काडी लावायची आणि पळून जायचं. संदीप जोशी म्हणत आहे की, आमचं कुलूप कोण तोडतंय. मात्र आम्ही कोणाचं कुलूप तोडायला आलो नाही. त्यांना सत्तेची मस्ती आहे. सत्ता दूर जाऊ द्या मग कळेल. बुडाला आग लागली की पाणी उकळते ते सुरू आहे. वस्तुस्थिती झोंबत आहे. सत्य पचत नाही, असा पलटवार त्यांनी केलाय.
धार्मिक ध्रुवीकरण करून राजकारण करणाऱ्यांना चपराक
वक्फ सुधारणा कायद्यातील काही महत्त्वाच्या आणि वादग्रस्त तरतुदींवर स्थगिती देण्याचा विचार सर्वोच्च न्यायालय करत आहे. वक्फ म्हणून घोषित केलेल्या मालमत्तांचा दर्जा रद्द करण्याचा अधिकार, तसेच केंद्रीय वक्फ परिषद व राज्य वक्फ मंडळांमध्ये बिगरमुस्लिम सदस्यांचा समावेश यांसारख्या तरतुदींवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश देण्याआधी सविस्तर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. याबाबत विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा निर्णय म्हणजे मोठी चपराक आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून राजकारण करणाऱ्यांना ही चपराक आहे. हिंदू मंदिरांच्या जागांची काय वाट लागली? कोणी घेतल्या? धार्मिक ट्रस्टच्या जागा कोणी घेतल्या? मराठवाड्यातील जमिनी सत्ताधाऱ्यांनी घेतल्या. पुण्यातील मंदिराच्या जागा कोणी घेतल्या? अयोध्येतील जागेबाबत काय झालं? जे देवाला सोडत नाही ते अल्लाला कसे सोडणार? राम असो की अल्ला एकच आहे. राजकारण, सत्ता त्यातून पैसे, पुन्हा सत्ता हे सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा























