Maharashtra Politics : कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची किडनी फेल, उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, नाहीतर...; उमेश पाटलांचा इशारा
Umesh Patil on Vijay Shivtare : कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची किडनी फेल झाली, उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, असं म्हणत उमेश पाटील यांनी शिवतारेंवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Politics : कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची (Vijay Shivtare) किडनी फेल झाली, उगाच अजितदादांवर (Ajit Pawar) खापर फोडू नका, नाहीतर फजिती ऐका अशी परिस्थिती होईल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी शिवतारेंवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे नेते यांनी अजित पवारांमुळे आपल्यावर ताण येऊन तब्येत बिघडली आणि किडनीचे आजार झाले असा आरोप केला होता. यावर अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी शिवतारेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
'कौटुंबिक त्रासामुळे शिवतारेंची किडनी फेल'
उमेश पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'शिवसेनेचे नेते शिवतारे यांनी वक्तव्य केलं की, अजितदादांच्या प्रेशरमुळे मला किडनीचा आजार झाला, किडनी फेल झाली. ह्रदय बंद पडलं, त्याच्यामुळे मला डायलीसिस करावं लागलं, त्यामुळे मला वेगवेगळे शारीरिक आजार झाले. गुंजवली धरणासाठी उपोषणाला बसल्यामुळे मला सगळे आजार झाले.'
उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, उमेश पाटील यांचा इशारा
उमेश पाटील यांनी शिवतारेंवर निशाणा साधताना म्हटलं की, शिवतारे धादांत खोटं बोलत आहेत. त्यांना जे काही त्रास झालेले आहेत, ते कौटुंबिक भांडणातून झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलेला पाहिलेला आहे. त्याच्यातून जो ताण आला, जे प्रेशर आलं, त्यातून हे सर्व आजार शिवतारेंना झाले आहेत.
...नाहीतर फजिती ऐका अशी परिस्थिती होईल
आता उघडपणे जास्त कुणाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला नको, पण त्यामध्ये आम्हाला डोकावायचं नाही. नाहीतर फजिती ऐका अशी तुमची परिस्थिती होईल. दोन्ही मुले सोबत राहत नाहीत, दोन्ही मुलं सोबत का राहत नाहीत, याचा त्यांना विचार करावा. त्यांच्या कुटुंबातील वादामुळे त्यांना हे आजार झालेले आहेत.
'शिवतारेंनी उपोषणाला बसण्याचं नाटक केलं'
10 वर्ष शिवतारे आमदार होते, त्यातील दुसऱ्या टर्मला मंत्रीदेखील होते, सिंचन मंत्री होते. या गुंजवली धरण शिवतारेंनी बांधलं का, त्यांचं काय योगदान आहे, गुंजवली धरणासाठी त्यांचं काय योगदान आहे, धरण बांधलं कुणी, असे अनेक प्रश्न उमेश पाटील यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. पुढे ते म्हणाले की , शिवतारे फक्त सांडव्यासाठी उपोषणाला बसले, म्हणजे सर्व काम झाल्यानंतर 0.1 टक्के कामासाठी त्याच्यासाठी यांनी उपोषणाला बसण्याचं नाटक केलं असं म्हणत पाटलांनी शिवतारेंवर निशाणा साधला आहे.
शिवतारेंनी पुरंदर तालुक्यासाठी काय केलं?
शिवतारेंनी पुरंदर तालुक्यासाठी काय केलं, अजितदादांनी जेजुरीला अ दर्जा दिला, शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला, मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या, पालखी मार्ग कुणी केला, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ कुणी केलं, हे सर्व अजित दादांनी केलं. पालखी मार्ग झाल्यामुळे पुरंदर तालुक्याचं आर्थिक विश्व बदललं. पुरंदर तालुक्याची पुणे, सातारा तालुक्यासोबत कनेक्टिव्हिटी वाढली, त्यामुळे पुरंदर तालुक्याचं अर्थकारण वाढलं. या सर्वामध्ये अजितदादांचं योगदान आहे की शिवतारेंचं योगदान आहे, असा सवालही उमेश पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंचे कान उपटावे
10 वर्षांत शिवतारेंनी फक्त पोपटपंची केली. 10 वर्षात या लोकप्रतिनिधीने शून्य योगदान दिलं आहे. अजित पवार आणि शरद पवारांचं नाव घ्याययं आणि प्रसिद्धीझोतात यायचं एवढंच शिवतारेंनी केलं आहे. एकीकडे मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची भाषा करता आणि दुसरीकडे एका-एका महत्त्वाच्या खासदाराच्या पाठी उभं राहण्याऐवजी त्यांच्या विरोध करता, अशी दुहेरी भूमिका शिवतारेंनी घेता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंचे चांगले कान उपटले पाहिजेत, असं आवाहन विजय शिवतारे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :