महाराष्ट्रात शेठजी-भटजींचं सरकार; राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक- श्याम मानव
Shyam Manav: शयाम मानव यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा हे सांगतानाच आपला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे.
Shyam Manav नागपूर: हे शेठजी व भटजींचे सरकार आहे, हे शेठजींची संपत्ती वाढवणारे आणि गरिबांना आणि गरीब बनवणारे सरकार आहे. त्यामुळे सरकार केंद्राचे असो किंवा महाराष्ट्राचे, ते सरकार उलथवून लावणे आपले कर्तव्य असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात पुरोगामी सामाजिक संघटनांच्या मेळाव्यात बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुरोगामी सामाजिक संघटनांची भूमिका काय असावी यावर विचार करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा" अभियान अंतर्गत पुरोगामी सामाजिक संघटनांचा एक मेळावा 24 जुलै रोजी नागपुरात आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना शयाम मानव यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार उलथवून लावा हे सांगतानाच आपला पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात आज तीनच आश्वासक चेहरे-
महाराष्ट्रात आज आपल्या समोर तीनच आश्वासक चेहरे आहेत. राहुल गांधी यांचे शब्द काँग्रेस पक्षात अंतिम असते. उद्धव ठाकरे यांची बांधिलकी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांशी असून त्यांच्याशी अनेक वेळेला संवाद ही झाले आहे.. शरद पवार यांना आपण सर्व पन्नास वर्षांपासून ओळखतो आणि त्यांची वैचारिक भूमिका सर्वाना माहित आहे. पक्ष फुटून ही ते भाजप समोर झुकलेले नाही, म्हणून आपण या तिघांवर विश्वास ठेऊ शकतो असे श्याम मानव म्हणाले. उद्या जर महाविकास आघाडी सरकार ने दिलेले आश्वासन पाळले नाही, तर आपण सर्व पुन्हा आंदोलन करायला मोकळे आहोत असे ही श्याम मानव यांनी सांगितले.
महाविकास आघाडीला माझा पाठिंबा- श्याम मानव
विशेष म्हणजे अनिल देशमुख यांचे ईडी प्रकरणाच्या मुद्द्यावरून कालच श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते... त्यानंतर फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हे ही सुपारीबाजाच्या नादी लागले का असं खोचक सवाल विचारला होता. फडणवीसांच्या वक्तव्याच्या काही तासानंतर श्याम मानव यांनी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
एवढे खोके घ्या, मंत्री पद घ्या, नाही तर जेलमध्ये जा...
एवढे खोके घ्या, मंत्री पद घ्या, नाही तर जेलमध्ये जा...असं गुवाहटीमधून आलेल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले. सर्व 40 आमदारांचे कागदपत्र तयार आहेत, अशी माहितीही मला त्यांनी दिली. त्यावेळी अॅन्टी डिफेक्शन कायदा लागू होईल, असं मला वाटलं होतं. परंतु त्या व्यक्तीने आम्हाला आधीच दिल्लीतून झालेल्या टेली काँफेरेनसिंगमधून न्यायालयाचे सर्व निर्णय आपल्या बाजूने येणार आहे, हे सरकार अडीच वर्षे चालणार असे सांगितले गेले होते. त्यावर मी म्हटले सर्वोच्च न्यायालय आहे ना, तेव्हा त्या मंत्री असलेल्या मित्राने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे आणि तसेच झाले. त्यामुळे सर्व आधीच फिक्स होते का अशी शंका येते, असंही श्याम मानव म्हणाले.
माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही- देवेंद्र फडणवीस
मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.