अमित ठाकरे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात, पण 'त्या' बैठकीला नितीन सरदेसाई गैरहजर, कुजबुजीनंतर खरं कारण समोर
आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वरळीची निवड केली. त्यावेळी राज ठाकरेंनी राजकारणापेक्षा बंधुत्वाला महत्त्व दिलं आणि आदित्य यांच्याविरोधात मनेसनं उमेदवार दिला नाही.
मुंबई : विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. पहिल्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली.कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढवा घेतला आहे. तसेच अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीत धरला. मात्र अमित ठाकरेंच्या उमेदवारींबाबत राज ठाकरे निर्णय घेणार आहेत. मनसेच्या पहिल्या यादीमध्ये बाळा नांदगावकर (शिवडी), शालिनी ठाकरे (वर्सोवा), स्नेहल जाधव (वडाळा), बबन महाडिक (कुलाबा), संदीप देशपांडे (वरळी), कुशल धुरी (अंधेरी पश्चिम), नयन कदम (मागाठाणे) यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. काल झालेल्या बैठकीला नितीन सरदेसाई गैरहजर होते. मात्र, त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना पूर्वकल्पना दिल्याची माहिती आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly constituency) शिवसेनेप्रमाणे मनसेचे मतदार आहेत. 2009 साली मनसेने हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावला होता. तसेच मागील 2014 आणि 2019 साली विधासभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या सदा सरवणकरांना टफ फाईट दिली होती. मागील दोन्ही निवडणुकीत माहीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. यंदा देखील अशीच लढत येथे पाहायला मिळणार. मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेला मनसे महायुतीत सहभागी झालेली नाही.
अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ कोणता?
विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे मुलाला मैदानात उतरवतील याची शक्यता त्याहून कमी आहे. 2019 साली आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंनी जसा वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ निवडला. तिथल्या सचिन अहिर सारख्या विरोधकाला; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला आपलंसं केलं. सुनील शिंदेसारखा सिटिंग आमदाराची.. हाडाच्या शिवसैनिकांची समजूत काढली.. एवढंच नाही तर त्यावेळच्या भाजपसारख्या मित्रपक्षालाही उद्धव ठाकरेंनी विश्वासात घेतलं.. तसंच काहीतरी राज ठाकरे यांना अमित ठाकरेंसाठी करावं लागेल.
माहीमची जागा ठाकरे गटाने सोडली तर वरळीचं काय?
आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वरळीची निवड केली. त्यावेळी राज ठाकरेंनी राजकारणापेक्षा बंधुत्वाला महत्त्व दिलं आणि आदित्य यांच्याविरोधात मनेसनं उमेदवार दिला नाही. जर अमित ठाकरे विधानसभा लढणार असतील तर उद्धव ठाकरे 2019 च्या मदतीची परतफेड करतील का? ठाकरेंची शिवसेना देखील अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उभा करणार नाही का? या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे. मात्र ठाकरे गटाने अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नाही चर्चेची ही गाडी पुन्हा येऊन अडकते ती वरळी मतदारसंघात... कारण राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून संदीप देशपांडेंची उमेदवार म्हणून अप्रत्यक्ष घोषणा केली आहे..
राज ठाकरेंसाठी मोठे आव्हान
अमित ठाकरेंच्या बदल्यात उमेदवार न देण्याचा निर्णय जर थोरल्या ठाकरेंनी घेतला. तर वरळीत ते मनसेकडून आदित्य ठाकरेंसाठी अप्रत्यक्ष मदतीची अपेक्षा ठेवू शकतात.. अशावेळी राज ठाकरे हे संदीप देशपांडे काय करणार हा देखील प्रश्न आहेच. अमित ठाकरेंनी निवडणूक लढवली तर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारेल हे नक्की असलं तरी तो मार्ग खडतर आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे मुलाला मैदानात उतरवतील याची शक्यता त्याहून कमी आहे. अमित ठाकरेंचा विधानसभेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त करणं हे मोठं आव्हान राज ठाकरेंसाठी असणार आहे.
हे ही वाचा :
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वरळीत आदित्य ठाकरेंना हरवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची खास रणनीती, मध्यरात्री राज ठाकरेंना भेटले