भारताचा WTC च्या फायनलमध्ये दोनदा पराभव कशामुळं झाला, आर. अश्विननं 'या' गोष्टीवर खापर फोडलं
WTC Final : भारतीय क्रिकेट संघाचा 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात पराभव झाला होता. आर अश्विननं याचं कारण सांगितलं आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळली आहे. मात्र, दोन्ही वेळेस त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यापैकी एका फायनलमध्ये रविचंद्रन अश्विन देखील संघाचा भाग होता. अश्विनने टीम इंडिया 2 वेळा फायनलमध्ये पोहोचूनही चॅम्पियन का बनू शकली नाही, याचे सर्वात मोठे कारण सांगितले आहे. त्याने यासाठी आयपीएलला जबाबदार धरले आहे. 2021 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडने 8 विकेट्सने, तर त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
आर अश्विननं आयपीएलवर खापर फोडले
रविचंद्रन अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना म्हणाला की, आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघाने 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळली आहे. तो म्हणाला की, आयपीएलनंतर लगेच फायनल खेळणे सोपे नसते आणि याच कारणामुळे भारतीय संघ चॅम्पियन बनू शकला नाही. भारताच्या माजी ऑफ-स्पिनर असलेल्या अश्विननं सांगितले की, कसोटी क्रिकेटला पुरेसा आदर दिला पाहिजे आणि यासाठी भरपूर सराव करणेही आवश्यक आहे.
वेस्ट इंडिज संघाच्या खराब स्थितीचे कारण
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिली टेस्ट तिसऱ्याच दिवशी संपली. त्या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 140 धावांनी बाजी मारली. तर दुसऱ्या टेस्टमध्येही कॅरेबियन संघाची स्थिती चांगली नाही. रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिज संघाच्या खराब स्थितीचे कारण फ्रँचायझी टी 20 क्रिकेट असल्याचे सांगितले आहे.
अश्विन म्हणाला, "वेस्ट इंडिज ज्या दृष्टीने टेस्ट क्रिकेटकडे पाहत आहे, तीच सर्वात मोठी समस्या आहे. भारत विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी वेस्ट इंडिजचे खेळाडू 22 सप्टेंबरपर्यंत सीपीएलमध्ये व्यस्त होते. सीपीएल संपल्यानंतर काही दिवसांतच ते येथे आले. त्यांना तयारीसाठी किती दिवस मिळाले असतील. संघाने कोणतीही नवीन तयारी केली नाही."
दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम सुरुवात
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला आज सुरुवात झाली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कसोटीत भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्या दिवसअखेर 173 धावांवर नाबाद आहे.तर, साई सुदर्शन 87 धावांवर बाद झाला. सध्या यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहेत.




















