कोकणात महाविकास आघाडीत जागांसाठी रस्सीखेच; 'या जागां'साठी जोरदार फिल्डींग!
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा देखील तितकाच महत्त्वाचा. या जिल्ह्यात एकूण विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. आमदारांची संख्या पाहता शिवसेनेचं या ठिकाणी वर्चस्व दिसून येतं.
Vidhan Sabha Election 2024 : सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) चर्चा, दावे - प्रतिदावे आणि रस्सीखेच राज्यातील इतर भागाप्रमाणे कोकणात (Konkan Election 2024) देखील पाहायाला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत बदललेली राजकीय गणितं, विजयी झालेले उमेदवार आणि मतांची टक्केवारी शिवाय जागांसाठी सुरू असलेली रस्सीखेच सध्या केंद्रस्थानी आहेत. पूर्वी जिंकलेल्या जागा आणि सध्याची राजकीय गणितं पाहता सध्या सर्वच पक्षांमधून इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक गणितं सांगत जागा पदरात पाडण्यासाठी देखील फिल्डींग लावली जात आहे. महाविकास आघाडी असो किंवा महायुती या दोन्ही बाजुनं या साऱ्या घडामोडी सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा विचार केल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या लढती या लक्षवेधी आणि प्रतिष्ठेच्या असणार आहेत. पण, जागा पदरात पाडून घेण्यासाठी लावली जात असलेली ताकद आणि केले जात असलेले दावे हे देखील सध्या उत्कंठावर्धक अशा स्थितीत आहेत. त्यामुळे कोणती जागा नेमकी कुणाला मिळणार? याच्या राजकीय गजाल्या देखील सुरू झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या जागेवर कुणाचा दावा?
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा देखील तितकाच महत्त्वाचा. या जिल्ह्यात एकूण विधानसभेचे तीन मतदार संघ आहेत. आमदारांची संख्या पाहता शिवसेनेचं या ठिकाणी वर्चस्व दिसून येतं. पण, सध्या स्थिती बदलत आहे. सावंतवाडी - दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघात दिपक केसरकर सध्या विद्यमान आमदार आहेत. एकसंध शिवसेनेतून आमदार झालेले केसरकर सध्या शिंदेंसोबत आहेत. तसं म्हटलं तर हि जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला जाईल अशी शक्यता आहे. पण, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं या जागेवर दावा केला आहे. अर्चना घारे या ठिकाणी जोरदार तयारी करत असून त्यांनी मतदारसंघात आपली ताकद आजमवण्यास सुरू केली आहे. वाढलेल्या गाठीभेटी देखील सर्व गणितं स्पष्ट करतात. दरम्यान या जागेवर शरद पवार गटानं दावा केला असून हि जागा शरद पवार गटाला जाणार असल्याचं बोललं जात आहे. वरिष्ठांनी देखील तसा संदेश दिल्याची माहिती आहे. तर, कुडाळ - मालवण आणि वैभववाडी - देवगड - कणकवली या मतदारसंघात फार मोठे बदल जागावाटपात होतील अशी स्थिती नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात जागा वाटपाची काय स्थिती?
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी राजापूर - लांजा - साखरपा या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं दावा केला आहे. अविनाश लाड या ठिकाणी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हि जागा देखील कुणाला जाणार याच्या वेगवेगळ्या गजाल्या सध्या कोकणात रंगल्या आहेत.
चिपळूण - संगमेश्वर या जागेवर देखील महाविकास आघाडीत रस्सीखेच आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले शेखर निकम या ठिकाणी विद्यमान आमदार. पण, महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या ठाकरे गटानं या विधानसभेवर दावा केला असून माजी आमदार सुभाष बने आपला मुलगा रोहन बने यांच्यासाठी आग्रही आहेत. त्याचवेळी भास्कर जाधव देखील या ठिकाणी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. पण, या जागेवर महाविकास आघाडीचा विचार करता शरद पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. प्रशांत यादव यांनी जोरदार तयारी देखील केली आहे. आगामी शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या नावाची घोषणा होणार का? याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.