Madha Loksabha: कालपर्यंत शरद पवारांशी इमान राखलं, पण शेवटच्या क्षणी आंबेडकरांचा हात धरला, वंचितचे माढ्यातील उमेदवार रमेश बारसकर कोण?
VBA Candidate list: प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये माढ्यातून रमेश बारसकर यांना संधी देण्यात आली आहे. रमेश बारसकर हे आठवडाभरापूर्वी शरद पवारांच्या पक्षात होते.
सोलापूर: महाविकास आघाडीशी युतीच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितने अलीकडेच 8 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर रविवारी रात्री वंचितकडून (VBA) आणखी 11 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकणंगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांमधील उमेदवारांचा समावेश आहे.
राज्यातील प्रतिष्ठित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि माढ्यातूनही वंचितने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या सोलापूरमध्ये वंचितने राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवल्याने प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माढ्यातून रमेश बारसकरांना उमेदवारी
गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी आणि नाराजीच्या बातम्यांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. माढ्यात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच आता वंचितने माढ्यातून रमेश बारस्कर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. रमेश बारसकर हे मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष आणि ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, रमेश बारसकर हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांना माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायचीच होती. परंतु, शरद पवार गटातून संधी मिळणार नाही, हे लक्षात येताच आठ दिवसांपूर्वी रमेश बारसकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. माढ्यामध्ये ओबीसी महासंघाच्या वतीने झालेल्या मेळाव्याचे निमंत्रक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा म्हणून बारसकर यांना संधी दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता माढ्यातील लढत आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. रमेश बारसकर हे महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणत्या उमेदवारासाठी धोका ठरणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.
आणखी वाचा