Vaibhav Khedekar MNS: आधी राज ठाकरेंनी हाकललं अन् आता कट्टर कार्यकर्त्यांनी साथ सोडली, महिनाभरातच वैभव खेडेकरांसोबत भाजपमध्ये गेलेले मनसैनिक माघारी परतले
Vaibhav Khedekar MNS: वैभव खेडेकर यांच्या सोबत पक्षातून बाहेर पडलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा मनसेत परतले आहेत.

Vaibhav Khedekar MNS: रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गड पुन्हा एकदा मजबूत झाला आहे. वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्या सोबत पक्षातून बाहेर गेलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता पुन्हा मनसेत परतले आहेत. झालेल्या गैरसमजांना मागे टाकत हे सर्व जण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.
जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्यासोबत उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, महिला पदाधिकारी तसेच विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मोठा समूह राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत दाखल झाला आहे. यामुळे नुकतेच भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकरांना मोठा धक्का बसलाय. तर राज ठाकरे यांच्या मनसेने रत्नागिरीचा गड राखल्याचे दिसून येत आहे.
Vaibhav Khedekar MNS: मनसेत पुन्हा दाखल झालेले प्रमुख पदाधिकारी
- अविनाश सौंदळकर – दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष (राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण)
- जुनेद बंदरकर – उपजिल्हाध्यक्ष (राजापूर विधानसभा)
- अरविंद मालाडकर – उपजिल्हाध्यक्ष (रत्नागिरी विधानसभा)
- सुनील साळवी – जिल्हा सचिव
- सचिन शिंदे – तालुका अध्यक्ष (रत्नागिरी)
- संदेश साळवी – तालुका अध्यक्ष (चिपळूण)
- नीलेश भामणे – तालुका अध्यक्ष (खेड)
- रुपेश चव्हाण – तालुका सचिव (रत्नागिरी)
Vaibhav Khedekar MNS: मनसेने गड राखला
राज ठाकरेंना सोडून गेलेले पदाधिकारी पुन्हा परतल्याने रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे संघटन पुन्हा जोमाने उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. “रत्नागिरीचा गड पुन्हा मनसेकडे आला आहे. आगामी काळात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.
Vaibhav Khedekar MNS: रत्नागिरीत वैभव खेडेकरांना मोठा धक्का
दरम्यान, मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा झडत असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत खेडेकरांचा भाजप प्रवेश पार पडला होता. यावेळी रत्नागिरीतील अनेक नेत्यांनी मनसेची साथ सोडली होती. मात्र आता वैभव खेडेकर यांच्या सोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा मनसेत परतले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत वैभव खेडेकरांना मोठा धक्का बसलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
























