गोळीबारात मृत्यू झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी लोकसभा लढवणार?; थेट भाजपच्या बालेकिल्ल्यातून उमेदवारी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
![गोळीबारात मृत्यू झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी लोकसभा लढवणार?; थेट भाजपच्या बालेकिल्ल्यातून उमेदवारी uddhav thackeray shiv sena may give ticket to abhishek ghosalkar wife tejasvee ghosalkar from north mumbai गोळीबारात मृत्यू झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी लोकसभा लढवणार?; थेट भाजपच्या बालेकिल्ल्यातून उमेदवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/23/95373cc0badec023d7e111238683b0b11711176676465988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जिंकण्याची शक्यता असलेल्या आणि सक्षम उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा विचार या दोन्ही युतींकडून करण्यात येतोय. दरम्यान, उद्धव ठाकरे मुंबईत मोठी राजकीय खेळी खेळण्याची शक्यता आहे. ते हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंकडून त्यांना मुंबई उत्तर मतदासंघतून तिकीट दिले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह चालू असताना शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस निघाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.
तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंना काय फायदा?
दिवंगत अभिषेक घोसाळकर हे ठाकरे यांचे समर्थक होते. ते शिवसेनेचे माज नगरसेवकही राहिलेले आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीने पाहायचे झाल्यास घोसाळकर यांचा चांगला जनसंपर्क होता. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट दिल्यास त्यांना मतदारांची सहानुभूती मिळू शकते. तसे झाल्यास तेजस्वी घोसाळकर यांचा विजय सुकर होऊ शकतो. हाच विचार उद्धव ठाकरे यांनी केला असावा.
फडणवीसांचे वक्तव्य ठरू शकते अडचणीचे
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येविषयी प्रतिक्रिया देताना गाडीखाली श्वान मेला तरी आता गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असे विधान केले होते. या विधानामुळेही विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यास हाच मुद्दा घेऊन भाजपाविरोधात प्रचार करता येऊ शकतो. तसेच तेजस्वी घोसाळकर यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाकडे फारसं काही नसणार आहे. हा विचार करूनच उद्धव ठाकरे तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट देण्याचा विचार करत असावेत, असे म्हटले जात आहे. असे झाल्यास येथून कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा
अभिषेक घोसाळकर हत्येच्या दीड महिन्यांनी पत्नी आणि वडील समोर, पहिला सवाल देवेंद्र फडणवीसांना!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)