Uddhav Thackeray: बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, दिल्ली काबीज करणार- उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Birth Anniversary) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Birth Anniversary) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यममातून उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. बाळासाहेबांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष भाजपवरही सडकून टीका केलीय.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "फेब्रुवारीत भेटलो होतो. त्यावेळी आपण राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायचं ठरवलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. आतासुद्धा दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरायचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचा विचार करत होतो पण थोडं माझं मानेचं दुखणं उपटलं. माझी शस्त्रक्रिया करावी लागली. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? व्हायरस त्याची लाट एकामागे एक आणत असेल तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाहीत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र पिंजून काढणार
"शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी लावलेल्या वृक्षाचे फळं आपण चाखत आहोत. आज आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे भेटतच आहोत. आपल्याला कुणी अडवू शकत नाही. आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलेलो आहे. मधले दोन महिने उपाचारात गेलो. मी लवकरात लवकर बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. तुमच्यासोबत तुमच्या साक्षीने भगव्याचं तेज आहे, जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
25 वर्ष युतीमध्ये सडली
भाजप टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाण आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णसारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढं अधिक खाज येतं. तसे हे सगळे गजकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाहीतर पुन्हा एकदा मथळा यायचा की मी त्यांना गजकरणी म्हटलं. मी त्यांना राजकारणाचं गजकरण आहे म्हणून मी बोलतोय"
हिंदुत्वावरून भाजपवर टीका
हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता.
महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढणार
एकट्यानं लढा म्हणायचं आणि सत्तेचा गैरवापर करायचा. हरलो तरी घरी घाबरायचं नाही, बघू किती दिव हरणार. पण आता लढणार. महाराष्ट्राबाहेर देखील आपण निवडणूक लढवायची.राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्याही बड्या नेत्यांनी प्रचारात उतरावं. सत्तेचा कसा वापर अधिक कसा करता येईल, याचा विचार करा आणि काम करा. हातात बळ नसेल, तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha