Uddhav Thackeray PC : राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे," असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे
Uddhav Thackeray PC : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे," असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसंच बुलढाण्यातील शेगाव इथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. ठाकरे कुटुंबाने मुंबईतील शिवाजी पार्कवर येत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, पण भाजपनेही राजकारण करु नये : उद्धव ठाकरे
दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद झाला आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कोणी कितीही म्हटलं तरी पुसता येणार नाही. ज्यांचा स्वातंत्र्यालढ्याशी सूतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या मुलांनी, पिल्लांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी होता, पण स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते, त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा हक्क नाही, त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करु नये. ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्या धोक्यात आल्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. पहिल्यांदा आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय हे सांगावं मग आम्हाला प्रश्न विचारावे. दुसरी गोष्ट भारतरत्न देण्याच अधिकार हा पूर्णपणे पंतप्रधानांचा आहे. आठ वर्षांत स्वातंत्र्यवीरांना तु्म्ही भारतरत्न का दिला नाही? आधी स्वातंत्र्यवीरांसारखं वागायला शिका. पाकिस्तान घ्यायचा हा भाग वेगळा, परंतु पाकव्याप्त काश्मीरमधली एक इंच जमीन सुद्धा आणलेली नाही. तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करु नये."
स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकत्र आलंच पाहिजे
"राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात अतीव आदर, प्रेम, निष्ठा आहे. पण ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतीकारांनी आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे ते आता धोक्यात येत आहे. देशाची पुन्हा गुलामगिरीकडे वाटचाल होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही काही वर्षांनी टिकेल की नाही अशी शंका आहे. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी एकत्र आलंच पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींच्या शेगावच्या सभेला उद्धव ठाकरेंची पाठ
दरम्यान राहुल गांधी यांच्या शेगाव इथे होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे जाणार नाही. पत्रकार परिषदेनंतर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी शेगावच्या सभेसंदर्भात विचारणा केली असता उद्धव ठाकरे यांनी नकारार्थी मान आणि हात हलवून उत्तर दिलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवल्याचं समजतं. स्वत: राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आणि शेगावमधील सभेला उपस्थित राहण्यासाठी आग्रह केला होता. परंतु उद्धव ठाकरे सध्या फिजीओथेरपी घेत आहेत. डॉक्टरांनी सल्ल्यानंतरच उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु उद्या होणार सभेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जाणार नाहीत.
संबंधित बातमी