Uddhav Thackeray : उद्धव कदम यांचा शिवसेनेतील प्रवेश म्हणजे आम्ही हिंदुत्त्व सोडल्याच्या भाजपच्या आवईला छेद : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Press Conference : विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे," असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray Press Conference : विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. "महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व (Hindutva) सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज संघ परिवारातील लोक हिंदुत्त्वाच्या शिवसेनेच्या परिवारात प्रवेश करत आहेत. हिंगोलीतले मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आणि आश्चर्य वाटते. साधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहेत. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे."
त्यांना मातोश्रीचं दरवाजे उघडे : उद्धव ठाकरे
"वेगवेगळ्या विचारांची बहुजन, वंचित काही ठिकाणी मुस्लीम बांधव सुद्धा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. एक वेगळं वातावरण, चित्र महाराष्ट्रात निर्माण होत आहे, जे देशासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अनेक विषय आहेत, त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. खरं हिंदुत्व शिवसेनेकडे आहे, असं ज्यांना वाटतं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. केवळ शिवसेनेला नाही तर महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्त्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन मी करतो," असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : उद्धव ठाकरे
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दोन अर्ज करुनही मुंबई महापालिकेकडून अद्याप परवानगी न मिळालेली नाही. याविषयी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, "दसरा मेळाव्याबाबत संभ्रम नाही. दसरा मेळावा आमचाच होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केलेली आहे."
'शिवसेना रस्त्यावरची वस्तू नाही, कोणीही उचलून खिशात टाकावी'
"शिवसेना आणि शिवसैनिक आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी. शिवसेनेला 56 वर्षे झाली आहेत, असे 56 लोक बघितलेली आहेत. शिवसेना ही निष्ठावंताच्या रक्तावर मोठी होणारी आहे, गद्दारांच्या नाही," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं : उद्धव कदम
तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव कदम म्हणाले की,"शिवसेनेचं हिंदुत्त्व हे खरं हिंदुत्त्व आहे, भ्रमित करणारं नाही. कारण मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं आहे. म्हणून या मातोश्रीचं महात्म्य आणि महत्त्व टिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगत आहेत, तिथे अस्वस्थ वाटत असेल तर मातोश्रीचं दार उघडं आहे." तसंच मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल, असंही ते म्हणाले.