असंच प्रेम राहू द्या, दादांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास!
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंची आधी चंद्रकांत पाटलांसोबत चर्चा, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच लिफ्टनं प्रवास, राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड...
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet at Vidhan Bhavan : मुंबई : आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशन गाजतं ते सत्ताधारी आणि विरोधकांच्या खडाजंगीनं. पण यंदाच्या अधिवेशनात काहीसं वेगळं चित्र दिसलं. आज सर्वात आधी विधीमंडळात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. त्यावेळी काहीसं पॉझिटिव्ह चित्र पाहायला मिळालं. ही भेट झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. दोघांनीही एकाच लिफ्टनं प्रवास केला.
काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. मात्र, आज बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्रानं आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडचं चित्र पाहिलं. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट झाली. गमतीशीर चर्चा झाली त्यानंतर असंच प्रेम राहू द्या, असं म्हणत चंद्रकांत दादांनी ठाकरेंचा निरोप घेतला. पण, त्यानंतरच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची लिफ्टजवळ भेट झाली.
विधिमंडळातील लिफ्टजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र दिसले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर सातत्यानं आरोपांच्या फैरी झाडणारे कट्टर विरोधक असलेले फडणवीस आणि ठाकरे यांनी एकाच लिफ्टनं प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर, दरेकर, प्रसाद लाडही लिफ्टमध्ये होते. लिफ्टमधून उतरल्यानंतर दोन्ही नेते दोन्ही दिशांना निघून गेले.
विधीमंडळाच्या लिफ्टजवळ ठाकरे आणि फडणवीसांची भेट, पुढे काय घडलं?
आजपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं आहे. विधीमंडळातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस विधीमंडळाच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत उभे होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी बातचित झाली. पण त्यानंतर मात्र, लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर मात्र, दोन्ही नेते दोन विरुद्ध दिशांना निघून गेले. तर दुसऱ्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही भेट झाली. अंबादास दानवे आणि अनिल परब त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी तिथेही खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं.
दरम्यान, एरव्ही एकमेंकांवर टीकेचे बाण सोडणारे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते आज एकमेकांशी अगदी हसत-खेळत बोलताना दिसले. गेल्या अनेक दिवसांत महाराष्ट्रानं अनेक राजकीय भूकंप अनुभवले. राज्यातील राजकारणानं कळस गाठल्याची अनेक वक्तव्यही आपण ऐकली. पण आज बऱ्याच दिवसांनी विधान भवनात हसतं खेळतं वातावरण पाहायला मिळालं.
दिल मिले ना मिले हात मिलाते रहिए...; विधीमंडळातील घडामोडींनंतर राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंची प्रतिक्रिया
विधीमंडळात घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, आजच्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणात काही बदल होतील, असं वाटत नाही. असं गमतीनं म्हटलं जातं की, दिल मिले ना मिले हात मिलाते रहिए, असं म्हणतात. त्याचप्रमाणे राजकीय मंडळी हात मिळवत असतात. त्यातूनच भविष्यात काही साखर पेरणीची शक्यता असते. अशातच एकदमच जी कटूता होती आणि एकमेकांकडे बघणंही अगदी टाळलं जात होतं. ते यानिमित्तानं निवळल्याचं पाहायला मिळतंय.
पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray- Devendra Fadnavis: ठाकरे- देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमध्ये!