मोठी बातमी : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित!
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने सत्ता मिळवली. राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला.
Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis: नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांची शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती होती. मात्र, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धवठ ठाकरेंच्यासोबत होते. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील आज विधिमंडळात आले होते. नागपूरमध्ये येताच सर्वप्रथम त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर व महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी, ईव्हीएम, निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं. त्यानंतर, ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. उद्धव ठाकरेंची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून शिंदे गटातील नेत्यांमध्ये देखील या भेटीनं आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही सदिच्छा भेट
ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
राजकीय पक्ष म्हणून आम्ही शुभेच्छा दिल्या
आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं राज्याच्या हिताच्या सूचना आम्ही करु, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर दिलीय.
भेटीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
दरम्यान, या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढता येणार नाही. राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, असे शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच, यापूर्वी देखील त्यांची लिफ्टमध्ये भेट झाली होती, त्यामुळे या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, असेही अंधारे यांनी स्पष्ट म्हटलं.
2019 च्या निवडणुकीनंतर दोघांमध्ये कटुता
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने सत्ता मिळवली. राज्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. त्यानंतर मुख्यमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सन 2019 साली महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आलेली कटुता पुढे पाच वर्षे कायम राहिली. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्याचं दिसून आलं. शिवसेना फुटीमध्ये भाजपच्या आणि खासकरून देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता नवे सरकार आल्यानतंर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा
छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी गुगली