दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसलंय, तोपर्यंत अन्याय सुरुच; ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, मोदींना टोला
उद्धव ठाकरेंनी यापूर्वी बजेटवर प्रतिक्रिया देताना, मला बजेटमधील जास्त काही कळत नाही. पण, पक्षाचा प्रमुख असल्याने प्रतिक्रिया द्यावीच लागते असे म्हटले होते
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पाचं स्वागत केलं जात असून महायुतीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी व महाराष्ट्राला समृद्ध करणारा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे विरोधकांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) महाराष्ट्रासोबत दुजाभाव करण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. तसेच, ह्या अर्थसंकल्पात काँग्रेसच्या न्यायपत्रातील योजना राबवण्यात येत असून ही उचलेगिरी असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बजेटवर ठाकरेस्टाईल प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंनी यापूर्वी बजेटवर प्रतिक्रिया देताना, मला बजेटमधील जास्त काही कळत नाही. पण, पक्षाचा प्रमुख असल्याने प्रतिक्रिया द्यावीच लागते असे म्हटले होते. त्यावरुनच भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावत महाराष्ट्राला बजेटमधून काय-काय मिळालं याची माहिती दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी बजेटमधून महाराष्ट्राला भरीव असं काहीच मिळालं नसल्याचं म्हटलंय. तसेच, पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
''पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे !'', अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्ध ठाकरेंनी आजच्या एनडीए सरकारने सादर केलेल्या बजेटवर दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपनेही ट्विट करुन प्रत्युत्तर दिलंय. त्यामध्ये, महाराष्ट्राला या बजेटमधून नेमकं काय मिळालं, याची माहितीच भाजपने दिलीय.
भाजपने ट्विट करुन दिली माहिती
ज्यांना अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशा उबाठांसाठी हा सोप्या भाषेतला अर्थसंकल्प, बजेटमधील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या घोषणांची यादी, असे ट्विट भाजपने केलंय.
सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी -
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
ही यादी बरीच मोठी आहे. बजेट संपूर्णपणे न वाचता उचलली जीभ लावली टाळ्याला या विरोधकांच्या वृत्तीला हे उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला कायमच प्राथमिकता दिली आहे. विरोधक कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता फक्त राज्यातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही भाजपने म्हटले आहे.
ज्यांना अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशा उबाठांसाठी हा सोप्या भाषेतला अर्थसंकल्प, बजेटमधील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या घोषणांची यादी…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 23, 2024
सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी -
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक…