उदय सामंतांविरोधात ठाकरेंची फिल्डिंग, मिलिंद नार्वेकरांचा खास दौरा; कोणता मोहरा रिंगणात उतरवणार?
Uday Samant vs Shivsena Uddhav Thackeray : मंत्री उदय सामंतांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
Uday Samant vs Shivsena Uddhav Thackeray, रत्नागिरी : मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सामंतांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी खास दौरा केलाय. त्यामुळे उदय सामंतांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
उदय सामंतांविरोधात लढण्यासाठी तीन प्रबळ दावेदार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या इच्छुकांनी तयारी करण्यासा सुरुवात केली आहे. वरिष्ठ नेत्यांना गाठणे, मुलाखती देणे, व्यूहरचना करणे यासारख्या गोष्टी घडत आहेत. त्यात आता कोकणातील रत्नागिरी - संगमेश्वर मतदारसंघ देखील मागे नाही. कारण, ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात आता ठाकरे गटातील तिघांनी तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुलाखती दिल्याची माहिती देखील एबीपी माझाला दिली आहे. यामध्ये माजी जिल्हाप्रमुक राजेंद्र उर्फ अण्णा महाडिक, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख प्रदिप उर्फ बंड्या साळवी तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि विविध पदांवर काम केलेले उदय बने यांची नावं आहेत. या तिघांनी देखील उदय सामंत यांच्याविरोधात लढण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुलाखती देखील दिल्या आहेत. पण, असं असलं तरी तिकीट मात्र कुणाला मिळणार? याची चर्चा सध्या मतदारसंघात जोरात सुरू आहे. त्याचवेळी भाजपकडून देखील मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नाही असं नक्कीच म्हणता येते. पण, सामंत यांनी मात्र यावेळी देखील मतदार माझ्या पाठिशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांचा
काही दिवसांपूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी दौरा केला होता. यावेळी त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहार आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना तुम्हाला इतर पक्षातील सक्षम उमेदवार चालेल का? असा सवाल केला होता. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते राहिलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा झाल्या. शिवाय, या चर्चा अद्याप देखील सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील मुळ असलेल्या तिन्ही उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तयारी केली तरी आदेश मात्र मातोश्रीवरून येणार आहे. परिणामी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचं उत्तर देखील लवकरच मिळणार आहे.
उदय सामंतांना विजयाचा कॉन्फिडन्स
दरम्यान, उदय सामंत यांनी मात्र माझ्याविरोधात कुणीही उमेदवार असला तरी मी पाचव्यांदा विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी मतदार माझ्या झोळीत भरभरून मतांच्या रुपाचं दान टाकतील. मला पुन्हा विधानसभेत पाठवतील. काळजी करण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या