ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वांचेच लक्ष मुंबईकडे (Mumbai) लागले आहे. राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच थेट सामना राज्यात लढणार असल्याचे दिसून येते. त्यासोबत, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन सध्या आपली उमेदवारी फिक्स करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena)असा सामना बहुतांश जागांवर होणार आहे. त्यापैकी, भायखळा मतदारसंघातून आता अरुण गवळी यांच्या कन्येनं तयारी सुरू केली आहे.
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा लढवण्यास इच्छुक असून सध्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत. यामिनी जाधव ह्या भायखळा मतदारसंघातून आमदार असून त्यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. येथील मतदारसंघात मुस्लीम मतदार अधिक असल्याने काही दिवसांपूर्वी यामिनी जाधव यांनी चक्क बुरखा वाटपाचाही कार्यक्रम मतदारसंघात घेतला होता.
मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
सध्या भायखळा विधानसभेत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आहेत. त्यामुळे, महायुतीमधील शिवसेना पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच, याठिकाणी ठाकरे गटाकडून आणखी पदाधिकारी देखील इच्छुक आहेत. मात्र, गीता गवळी यांची उमेदवारी दावेदार मानली जाते. सध्या गीता गवळी या अखिल भारतीय सेना पक्षाच्या माजी नगरसेवक आहेत. बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आशा गवळी त्यासोबतच गीता गवळी यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाकडून गीत गवळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, गीता गवळी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाल्यास यामिनी जाधव यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.