Uddhav Thackeray on Amit Shah : पक्ष फोडाफोडीवरुन उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना टोला, देवेंद्र फडणवीसांचा 'चेलेचपाटे' म्हणून उल्लेख
Uddhav Thackeray on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सभा घेतली. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना आम्ही फोडली नाही, तर ती उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे फुटली असा दावा केला
Uddhav Thackeray on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सभा घेतली. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना आम्ही फोडली नाही, तर ती उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पुत्रप्रेमामुळे फुटली असा दावा केला. शिवाय राष्ट्रवादीही शरद पवारांचे कन्येवर प्रेम असल्यामुळे फुटली, असं अमित शाह म्हणाले होते. अमित शाहांच्या दाव्यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर चौफेर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधलाय. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चेलेचपाटे म्हणून केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाहाचे भाजपमधील स्थान काय आहे? आता भाजपचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत, हे तेच सांगू शकतील. मला अमित शाहांना सांगायचं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बोलता, तेव्हा तुमच्यामध्ये आणि तुमच्या चेलेचपाट्यांमध्ये एकवाक्यता असू द्या. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हणालो होतो आणि दोन पक्ष फोडून परत आलो,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.
देवेंद्र फडणवीस यांचा चेलेचपाटे म्हणून उल्लेख
गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची वारंवार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस लग्नात येऊन 35 पोळ्या खातील आणि नवरा बायकोमध्ये भांडण लावतील, ठाकरेंनी म्हटलं होतं. आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा चेलेचपाटे म्हणून उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही जर नितीन गडकरींच्या विकास कामांची यादी वाचून दाखवली तर तुम्हाला 4 ग्लास कोमट पाणी पिण्याची वेळ येईल.
तुमच्या पुत्रामुळे भारत वर्ल्डकप हरला
आम्ही लोकशाही लोकशाही लढत आहोत. अमित शाहांना मला सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरलाय. महाराष्ट्रात खुलेआम गुंडाराज सुरु आहे. कोण कोठेही जाऊन गोळीबार करतय. यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. यांचे राज्य चालवण्याकडे कोणतेही लक्ष नाही. तरिही यांना जनतेची मतं पाहिजे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.