Uddhav Thackeray: तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना जशास तसं उत्तर, पुत्रप्रेम टीकेची सव्याज परतफेड!
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांची अमित शाह यांच्यावर टीका. पुत्रप्रेमाच्या टीकेची सव्याज परतफेड. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या लढाईत उद्धव ठाकरे विरुद्ध अमित शाह यांच्यातील लढाई चांगलीच रंगतदार होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील सभेत बोलताना अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामना हारला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना लगावला. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. ते सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अमित शाह यांनी भंडाऱ्यातील सभेत म्हटले होते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार सातत्याने भाजपने आमचा पक्ष फोडला, असे म्हणत असतात. पण मला महाराष्ट्रातील जनतेला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपने फोडले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले, असे अमित शाह यांनी म्हटले होते. याविषयी उद्धव ठाकरे यांना आजच्या पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मिश्कील शैलीत अमित शाह यांना टोला लगावला. त्यांनी म्हटले की, मला अमित शाह यांना सांगायचं आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला आहे. मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
अमित शाह यांचे पुत्र जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शक्यतो मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता येथील मैदानांवर होतो. मात्र, ही परंपरा मोडीत काढत बीसीसीआयने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर केले होते. या निर्णयावर अनेकांना प्रश्नही उपस्थित केले होते.
तुमच्या चेलेचपाट्यांना समजवा, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे अमित शाह यांचा चेला म्हणून संबोधले. त्यांनी म्हटले की, अमित शाह यांचं पक्षातील स्थान नक्की काय आहे? भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा