सुरुवात कोणी केली? मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलंय, ठाण्यातील मनसेच्या राड्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Uday Samant on Shivsena MNS Thane Rada : ठाण्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
Uday Samant : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आता यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या. सुरुवात कोणी केली? मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले आहे.अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे. सुरुवातीला हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
मनसैनिक दुबळे नाहीत
उदय सामंत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हीन दर्जाने बोलले जात आहे ते आम्ही सहन करत आहोत. शाब्दिक हल्ले समजू शकतो पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे. राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करायची गरज नव्हती. मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
गडकरी रंगायतनमध्ये राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन सोडण्यात आल्यानंतर रात्री उशिरा नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर, ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणि गडकरी रंगायतन येथे राडा घालणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याने मनसेच्या जिव्हारी लागले होते. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. राज ठाकरेंनीही यावर माझ्या नादी लागू नका, नाहीतर कार्यकर्त्यांचे मोहोळ उठले तर सभाही घेऊ देणार नाही, असा इशाराच दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या.
आणखी वाचा