(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तुम्ही टिंगल टवाळी केली तर ऐकून घ्यायचं, तुम्हाला बोललं तर गाड्या फोडणार....'; उद्धव ठाकरेंसाठी जितेंद्र आव्हाड मैदानात, राज ठाकरेंवर निशाणा
Shivsena MNS Thane Rada: मनसे आणि ठाकरे गटाच्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.
Shivsena MNS Thane Rada मुंबई: ठाण्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आले. त्यामुळे ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसून आले. मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
मनसे आणि ठाकरे गटाच्या वादात आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, खालील तीन व्हिडीओमधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे जगभर कौतुक केले जायचे. त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही.
तुमची टिंगल टवाळी ऐकून घ्यायची- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. विरोधी पक्षातील नेत्याचा जीवावर जर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात...कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे, पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार...चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचं संपूर्ण ट्विट-
उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2024
खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या… pic.twitter.com/o0WOzUkwwR
नेमकं काय घडलं?
राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याची घटना घडली होती. ही गोष्ट मनसेच्या मोठी जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही आल्या. खुद्द राज ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देत, माझ्या नादी लागू नका नाहीतर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलं तर सभाही घेऊ देणार नाहीत असा इशाराच दिला.राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना तशी संधीही मिळाली. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या.
संबंधित बातमी:
ठाण्यातील राड्यानंतर कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल; मनसैनिकांचा पोलीस स्थानकात जल्लोष