भूषण देसाईंवर भाजपने केले होते 'हे' गंभीर आरोप, प्रसाद लाड यांनी दिला होता इशारा
भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? असे सवाल विचारल भाजपने भूषण देसाई यांच्यावर आरोप केले होते.
मुंबई : ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी पक्ष प्रवेश केला. मात्र या भूषण देसाई यांच्यावर काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले होते.
भाजप नेत्यांनी देसाईंवर काय आरोप केले होते?
वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेल्याने त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु होती. या दरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, त्यांचा मुलगा भूषण देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं होतं.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
प्रसाद लाड म्हणाले होते की, “महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. 21 सप्टेंबर 2021 मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात, हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं.''
''भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला होता
शिंदेंसोबत का गेले भूषण देसाई?
बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भूषण देसाई यांनी म्हटले.
कोणाला भाजपच्या वाॉशिंग मशीनमध्ये जायचं असेल तर जाऊ द्या
या पक्ष प्रवेशाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, ''या संदर्भात माझं काही बोलण झालं नाही. सुभाष देसाई निष्ठावान आहेत. त्यांनी आयुष्य पक्षासाठी दिलेलं आहे. भूषण देसाई गेले हा धक्का मानत नाही. कोणाला भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जायचं असेल तर जाऊ दया.''
सुभाष देसाई यांनीही दिली प्रतिक्रिया
''माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे'', असे सुभाष देसाई यांनी भूषण देसाई यांच्या पक्ष प्रवेशावर मत व्यक्त केलं आहे.