MNS Shivsena Alliance : ठाकरे-मनसे युतीच्या चर्चा; आदित्य ठाकरेंकडूनही युतीला हिरवा कंदील, मनसेचं मौन? राज ठाकरेंकडून प्रतिसाद कधी मिळणार?
MNS Shivsena Alliance : राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद मनसे सोबत युती करण्याला दिला होता. मात्र, दोन्ही नेते पुन्हा परदेशी गेल्यानंतर या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या.

मुंबई: ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार का? या चर्चा मागील दोन महिन्यापासून जोर धरु लागल्या आहेत. त्यात आदित्य ठाकरे यांनी मागील 2 आठवड्याभरापासून मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचं प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्ष सोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत, आम्ही साद दिली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद मनसे सोबत युती करण्याला दिला होता. मात्र, दोन्ही नेते पुन्हा परदेशी गेल्यानंतर या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद
ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महत्त्वाचे नेत्यांनी आपण मनसे सोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. माझ्यासोबत युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा युती संदर्भात पुढे पाऊल टाकण्यास तयार असल्याचं संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट केलं. ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, अंबादास दानवे या नेत्यांनी सुद्धा मनसे सोबत आपला पक्ष जाण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रत्यक्षात या चर्चेसाठी पुढाकार कोणी घेणार का?
मात्र, मनसेकडून याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही, युतीच्या चर्चेला राज ठाकरेच्या मुलाखतीतून सुरुवात झाली. त्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळा घेतला असल्याचा राज ठाकरेंनी त्यानंतर झालेल्या मुलाखतीत सांगितलं. शिवाय, मनसे नेत्यांकडून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे योग्य भूमिका योग्य वेळी घेतली असे सांगितले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळालेल्या युती संदर्भातील सकारात्मक प्रतिक्रियेला मनसेकडून साद मिळणार का? राज ठाकरे युती संदर्भातील चर्चेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोर लावला जात असताना तयार होणार का? प्रत्यक्षात या चर्चेसाठी पुढाकार कोणी घेणार का? पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का? हे सगळ्या प्रश्नांची उत्तर अजूनही अनुत्तरीत आहेत.
उद्धव ठाकरे अनुकूल मात्र...
गेले काही दिवस संजय राऊत सतत ही भूमिका मांडत आहेत. ही भूमिका ऐकून यावेळी ठाकरेंची शिवसेना मनसे सोबत युती करण्यासाठी पूर्णपणे अनुकूल आणि सकारात्मक आहे असंच चित्र उभं राहतं. मात्र उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं, त्यांनी टाकलेल्या अटीशर्ती ऐकल्या की कन्फ्यूजन आणखी वाढलं. उद्धव ठाकरेंच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढायचा ते भल्याभल्यांना लक्षात आलं नाही.
युती चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही
मात्र याचा पुढचा अध्याय सुरु व्हायच्या आतच ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेले. मायदेशी परत आल्यानंतर सुद्धा युती चर्चेची गाडी काही पुढे गेलीच नाही. आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एप्रिलमध्ये दिलेल्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढला गेला अशी सारवासारव शुक्रवारी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केली. त्यामुळे आधीच्या कन्फ्यूजनमध्ये आणखी भरच पडली.

























