(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : सावरकर यांच्याविरोधात बोलणे खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींना इशारा
देश राहुल गांधी यांना देशातील जनता माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं, तो या वक्तव्याने गमावलं असल्याची, टीकाही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule on Bharat Jodo Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यात्रा थांबवायची असती तर आम्ही पहिल्या दिवशी थांबवली असती, आम्हाला त्याच्यात रस नाही. मात्र महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांच्याविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राहुल गांधींना दिला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी असल्याचेही यावेळी ते म्हणाले.
पुढे बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. काँग्रेस पार्टी (INC) त्याचं समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असूनही ते जाणूनबुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशात त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होत आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं तो या वक्तव्याने गमावला आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राहुल गांधी मौन का?
राजीव गांधींच्या (Rajiv Gandhi) जयंती, पुण्यतिथीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thakre) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी कुठेही प्रतिमेला फुलं वाहिलीत का, चार शब्द ते बोलले का? उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात. फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं संविधान स्वीकारण्याएवढेच आता बाकी राहिले असल्याचा टोलाही त्यांनी लागावला.
त्यांना इतिहास माहित नाहीः उपमुख्यमंत्री
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. राहुल गांधी यांना इतिहास माहित नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राहुल गांधी यांनी पुन्हा आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांचा मी निषेध करतो. सावरकर यांच्या मागे मोठ्या प्रमाणातील भारतातील जनता होती. महाराष्ट्रात येऊन जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केलं जात आहे. अंदमानच्या काळकोठडीत सावरकर यांनी शिक्षा भोगली आहे. माझा उद्धव ठाकरे यांना प्रश्न आहे की, ते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहेत की सर्मथन करणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ही बातमी देखील वाचा