Sushma Andhare : "डाव तुमच्या हातात दिला तरी तुम्हाला जिंकता येत नाही"; सुषमा अंधारेंचा टोला
MLA Disqualification Case : शिवसेना शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
MLA Disqualification Case Sushma Andhare मुंबई : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत शिंदेंना टोला लगावला आहे. “तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही ” , असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भाजप, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.
खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच
21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते.पक्ष प्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत . त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
सुमारे बाराशे पानांचे निकालपत्र
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. 20 डिसेंबर 2023 रोजी ही सुनावणी संपली. एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत हा निकाल वाचला जाणार गेला. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले होते.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
- शिंदेना पक्षातून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही. मनात आलं म्हणून कुणालाही काढता येत नाही.
- आधीच्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहित धरता येत नाही.
- त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत, तो चुकीचा आहे.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही.
- त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- पक्षप्रमुखांचं मत हे अंतिम नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाहीत.
- निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे
- एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती.त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत
- 25 जून 2022 ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा. तसंच या बैठकीत 7 निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या ॲफिडेव्हीटमध्ये करतात. पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचं लिहिलंय पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत.
आणखी वाचा