Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग येणार, सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या चौकशीला सुरुवात. सुरेश धस तातडीने फडणवीसांच्या भेटीला
मुंबई: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेले वाल्मिक कराड यांनी अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गेल्या 22 दिवसांपासून सीआयडीची 9 पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, शेवटपर्यंत सीआयडीला वाल्मिक कराड सापडले नाहीत. अखेर वाल्मिक कराड यांनी स्वत: स्थळ आणि काळ ठरवून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर आता लगेचच सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. एकीकडे वाल्मिक कराड यांची चौकशी सुरु असताना मुंबईत त्यांच्या विरोधकांची जमवाजमव सुरु झाली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरुन झाली, असा आरोप करत बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरले होते. मंगळवारी वाल्मिक कराड हे पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती बाहेर आल्यानंतर सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी तातडीने मुंबई गाठली होती. याशिवाय, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हेदेखील मुंबईतच उपस्थित आहेत. हे सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात. काहीवेळापूर्वीच संदीप क्षीरसागर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. तर सुरेश धसही थोड्याचवेळात याठिकाणी पोहोचणार आहेत. हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना त्यांच्याविरोधात एकटवत हे प्रकरण लावून धरले होते. संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांनी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतरही बाहेर सातत्याने हा मुद्दा लावून धरला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हेच आहेत, असा आरोप या दोन्ही नेत्यांनी वारंवार केला होता. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करताना सुरेश धस यांनी सातत्याने 'आका' या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्राच्या राजकारणात वाल्मिक कराड यांची 'आका' ही नवी ओळख प्रस्थापित झाली होती. आता वाल्मिक कराड यांनी पोलिसांसमोर सरेंडर केल्यानंतर सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून याप्रकरणात आणखी ताकद लावली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने देवेंद्र फडणवीस आणि या दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
आणखी वाचा