Sunil Kedar : 30 सप्टेंबरची मुदत संपली, सुनील केदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहणार? कारण समोर
Sunil Kedar : नागपूरमधील काँग्रेस नेते सुनील केदार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील कारण समोर आलं आहे.
नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढू शकणार नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात पाच वर्षाची शिक्षा झाल्यानंतर निवडणूक कायद्याप्रमाणे आमदारकी गमावली. सुनील केदार यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिक्षेला न्यायालयाची स्थगिती मिळवणे आवश्यक होते. मात्र, विहित मुदतीत सुनील केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्याचे समोर आले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
बँक घोटाळा प्रकरणी शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्यामुळे काही आठवड्यांपूर्वी सुनील केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भातला अर्ज लवकर करण्यास सांगितले होते. तसेच सत्र न्यायालयाने त्यासंदर्भात 30 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्यावा अशी सूचना ही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मात्र, असे असतानाही सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय समोर त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासंदर्भात 30 सप्टेंबरच्या विहित मुदतीत कोणताही अर्ज केलं नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बँक घोटाळा प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला स्थगिती मिळवून सुनील केदार विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी आहे.
यासंदर्भात प्रकरणाचे सरकारी वकील एड. नितीन तेलगोटे यांनी एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बातचीत करताना सांगितले की सुनील केदार आणि इतर आरोपींनी 30 सप्टेंबर पर्यंत याप्रकरणी सुनावणी संदर्भात कुठलाही अर्ज सत्र न्यायालयासमोर केलेला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 30 सप्टेंबर पर्यंतची मर्यादा संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या विहित मुदतीत सुनील केदार यांच्याकडून कुठलाही अर्ज दाखल न झाल्यामुळे आता काही ही होणे शक्य नाही.
सर्वोच्च न्यायालयाने आधीच शिक्षेला स्थागिती देण्याची मागणी फेटाळून लावली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने केदार यांच्या अर्जावर सत्र न्यायालयाने 30 सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्यावे, असे सांगितले होते. मात्र ,सुनील केदार यांनी त्या काळात कुठलाही अर्ज न केल्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळू शकलेली नाही त्यामुळे ते निवडणूक लढवण्यास अपात्रच राहणार आहेत.
इतर बातम्या :
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण