Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचे विरोधक एकवटले, भाजपमधूनही राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंना बळ; यंदा विखे पॅटर्न फेल जाणार का?
Ahmednagar Lok sabha Election : नगर जिल्ह्यात दरवेळीप्रमाणे विखेंचे विरोधक एकत्रित आले असून त्यामध्ये आता भाजपच्या काही नेत्यांचाही समावेश असल्याचं दिसतंय.
अहमदनगर: सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप खा.सुजय विखे (Sujay Vikhe Patil) विरुद्ध राष्ट्रवादी आ. निलेश लंके (Nilesh Lanke) किंवा निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्यात लढत होऊ शकते. तसं राजकीय चित्र सध्यातरी दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या विचार केला तर पूर्वीपासून विखे विरुद्ध इतर सर्व अशी स्थिती पाहायला मिळत होती. तसंच यंदा देखील चित्र आहे, पण त्यात भर पडली आहे ती स्वपक्षीयांची देखील. खा.सुजय विखेंच्या विरोधात स्वपक्षीयांनी देखील शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र नेहमीप्रमाणे 'विखे पॅटर्न' वापरून सुजय विखे यातून मार्ग काढणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही राहिली आहे. मात्र दुसरीकडे विखेंविरुद्ध इतर सर्व असे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. मग ती निवडणूक कोणतीही असो, सहकाराची असो की सार्वत्रिक निवडणूक, प्रत्येक निवडणुकीत विखेंना विरोधकांच्या एकजुटीचा सामना करावा लागला आहे.
विखेंच्या विरोधकांचे राष्ट्रवादीच्या लंकेंना बळ
पूर्वी विखे विरोधकांचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असायचे. मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत गेले होते. त्यावेळीही जिल्ह्यातील राजकीय लढाया याच पद्धतीने रंगत होत्या. आताही विखे कुटुंबीय भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा विखेविरुद्ध इतर सर्व असे चित्र निर्माण झाले आहे. फरक एवढाच आहे की यंदा विखेविरुद्ध इतर सर्वांमध्ये भाजपचेही नेते आहेत. त्यामुळे कुठेतरी भाजप खा.सुजय विखेंचे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या आ. निलेश लंकेंना अप्रत्यक्षपणे बळ देण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून केलं जातंय.
देवेंद्र फडणवीस जेव्हा नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे या दोन नेत्यांमधील वाद हा ‘चहाच्या पेल्यातील वादळ’ असल्याचे म्हटले होते. मात्र हे वादळ चहाच्या पेल्यातील न ठरता, हे वादाचे वादळ जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातही पाहायला मिळत आहे.
सहकारातील दिग्गज नेते स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकत मैदानात उडी घेतली आहे. विखेंविरोधातच त्यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा देखील काढला होता. तर विखेंचे विरोधक मानले जाणारे आ. निलेश लंके यांना देखील ते बळ देताना दिसत आहे. कधी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावून तर कधी महानाट्याला हजेरी लावून त्यांनी लंकंना बळ दिल्याचं दिसत आहे.
'विखे पॅटर्न'मुळे नेहमीच मार्ग काढला
जरी अहमदनगर जिल्ह्यात विखे विरुद्ध सर्व असं चित्र नेहमी पाहायला मिळालं असलं तरी यातून विखेंनी नेहमीच मार्ग काढला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत "विखे पॅटर्न" चालणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
विखेंचे भाजपमध्ये बळ वाढलं
विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षालाच मोठा फटका बसला. त्यावेळी पराभूत झालेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांनी एकत्र येत विखे यांच्या विरोधात पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र घडले उलटेच, राधाकृष्ण विखे यांचे स्थान आणि महत्व अधिकच बळकट झाले. आता विखे पिता-पुत्रांना महाराष्ट्रातील नेत्यांचा आधार न घेता थेट केंद्रीय नेतृत्वाची भेट मिळत आहे. त्यातच विखे कुटुंबाला नेहमीच चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो, म्हणूनच मी माझ्या मुलाचं नाव अभिमन्यू ठेवलं आहे आणि सर्व भाजपचे नेते सद्दामच्या सोबत असल्याचं सुजय विखे यांनी म्हटले आहे
जिल्ह्यात विखे विरोधात सर्व असे विरोधकांचे एकत्रीकरण जरी सुरू आहे. असं असलं तरी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आ. निलेश लंके आणि खा.सुजय विखे यांच्यामध्ये लढत झाली तरी आज विखेंच्या विरोधात बोलणारे भाजप नेते उघडपणे निलेश लंके यांना मदत करू शकणार नाहीत. कारण भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजपची शिस्त आणि "विखे पॅटर्न" च्या जोरावर विखे विरोध मोडून काढणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा: