Shivsena Uddhav Thackeray : फेसबुक पोस्टच्या वादातून ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचे अपहरण करून बोट छाटले, भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Shivsena Uddhav Thackeray : माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ठाकरेंच्या शहरप्रमुखाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Shivsena Uddhav Thackeray, नांदेड : नेत्याच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Thackeray) लोहा येथील उपशहरप्रमुखाचे अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आलीये. या मारहाणीत ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाचे बोट छाटले गेल्याचा प्रकार समोर आलाय. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. नांदेडमध्ये (Nanded) हा प्रकार घडला.
शहरप्रमुखाला फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण
अधिकची माहिती अशी की, भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल रात्री वडवळे यांचे अपहरण केले. एका फार्महाऊसवर नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. मारहाणीत त्यांचे एक बोट छाटल्या गेले.
मतदारसंघात चिखलीकर यांची दादागीरी वाढली, ठाकरे गटाचा आरोप
दारूची बॉटल डोक्यावर ठेवून वडवळे यांना नाचायला लावले. त्यांना पोस्टबद्दल माफी मागायला लावली. त्यानंतर ठाकरेंच्या शहर प्रमुखांना आणून एक रुग्णालयात टाकून देऊन आरोपी पसार झाले, असे आरोप जखमी शहरप्रमुखांच्या आई आणि भावाने केले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मतदारसंघात चिखलीकर यांची दादागीरी वाढली. आरोपींना अटक केली नाही तर लोहा - कंधार बंद करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आलाय.
कोणत्या पोस्टवरुन झाला वाद?
नांदेडचं पार्सल चिखलीला आलं, लोह्याचं पार्सल चिखलीला पाठवायचं, अशा आशयाची पोस्ट संबंधित शहरप्रमुखाने केली होती. याशिवाय काही आक्षेपार्ह पोस्ट त्यांच्याकडून करण्यात आल्या होत्या.
प्रतापराव चिखलीकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव
भाजप नेते प्रतापराव चिखलीकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांना प्रतापराव चिखलीकर यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. वसंतराव चव्हाण यांनी चिखलीकर यांच्याविरोधात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या