(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सकाळच्या भोंग्याला चपराक; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना टोला
Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आणि यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आगामी राजकारणाबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
Thane : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आणि त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी विरोधकांसह संजय राऊतांवर (Sanjay Raut) सडकून टीका केली. सकाळचा भोंगा सरकार पायउतार होणार असं ओरडत होता, त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसल्याचं नरेश म्हस्के म्हणाले. निकालानंतर संजय राऊतांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवे होते, असा टोलाही म्हस्के यांनी राऊतांना लगावला.
आगामी निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार पूर्ण वेळ राहणार, असं नरेश म्हस्के म्हणाले. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार असल्याचंही म्हस्के यावेळी म्हणाले.
टीका करुन सहानुभूती घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न
निकालानंतर विरोधक टीका करुन सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यात सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली होती. निकाल लागल्यानंतर ठाण्यात जल्लोष साजरा केला जात असल्याचं नरेश म्हस्केंनी सांगितलं.
ठाकरे गटातील उरलेले आमदारही संपर्कात
उद्धव ठाकरेंना 50 आमदार सांभाळता आले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उरलेले आमदार आणि खासदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी म्हस्के यांनी केला. खुर्चीसाठी पक्षाचे विचार उद्धव ठाकरेंनी बदलले आणि याचाच फटका त्यांनी बसत असल्याचं म्हस्के म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष फुटणार
महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि याचा प्रत्यय काही दिवसांतच होईल, असा दावाही नरेश म्हस्केंनी केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदारही संपर्कात असल्याचं नरेश म्हस्केंनी सांगितलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्यांचे आमदार आमच्या पक्षात सामील होणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. बहुसंख्य आमदारांचे मला आणि मुख्यमंत्र्यांना फोन आल्याचं नरेश म्हस्केंनी सांगितलं.
आता डबल बहुमत होणार
सर्व पक्षांतील बहुसंख्य आमदार शिवसेनेत सामील होणार असल्यानं आता जे बहुमत आहे ते डबल बहुमत होणार असल्याचं नरेश म्हस्के म्हणाले. रक्ताचा वारसा म्हणून पक्षावर ताबा घेत होते त्यांना चपराक बसली असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
हेही वाचा: