धाराशिवमध्ये ओमराजेंची सभा; आमदार कैलास पाटलांना भोवळ, स्टेजवरच कोसळले
Lok Sabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर, दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी कैलास पाटील यांना व्यासपीठावरच भोवळ आली.
![धाराशिवमध्ये ओमराजेंची सभा; आमदार कैलास पाटलांना भोवळ, स्टेजवरच कोसळले Shivsena MLA Kailash Patil Sunstroke in dharashi rally of Omraje nimbalkar धाराशिवमध्ये ओमराजेंची सभा; आमदार कैलास पाटलांना भोवळ, स्टेजवरच कोसळले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/550beab75aea0e687f136beba0b4fbeb1713266953349924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धाराशिव : शिवसेना फुटीतील बंडावेळी एकनाथ शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परत आलेले शिवसेना आमदार कैलास पाटील यांना चक्कर येऊन ते खाली कोसळल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यानंतर, दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी कैलास पाटील यांना व्यासपीठावरच भोवळ आली. कडक उन्हाच्या पाऱ्यात ही सभा चालू होती, शिवसैनिकांची मोठी गर्दी सभास्थळी होती. तर, दिग्गजांची उपस्थिती व्यासपीठावर होती. मात्र, उष्माघातामुळे आमदार पाटील यांना भोवळ आली. त्यानंतर, सर्वच नेत्यांना त्यांच्याजवळ जाऊन त्यांना धीर दिला, काहींनी पाणी प्यायलही दिलं.
धाराशिवचे ओमदादा आणि फोनवाला खासदार म्हणून लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकरांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, आमदार सचिन अहेर यांच्यासह अनेक दिग्गजांनी धाराशिवला हजेरी लावली. पला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ओमराजेंनी तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर, धाराशिवमध्ये मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी, आमदार कैलास पाटील यांना भोवळ आल्याने ते व्यासपीठावर खाली कोसळले. विशेष म्हणजे येथील सभेत आदित्य ठाकरे यांनीही कैलास पाटील यांच्या निष्ठेचं उदाहरण देत कैलास पाटील व ओमराजेंचं कौतुकही केलं होतं.
शिवसेनेतील बंडानंतर आमदार कैलास पाटील हे सुरतमार्गे गुवाहटीला जाणाऱ्या नेत्यांच्या गाडीतून निघून आले होते. त्यानंतर, ते थेट मुंबईतील मातोश्री बंगल्यावर दाखल झाले. त्यांनी घडलेली घटना पक्षप्रमुख आणि माध्यमांसमोर मांडली होती. त्यामुळे, कैलास पाटील राज्यभर परिचीत झाले होते.
लाडक्या दादासाठी धाराशिवमध्ये आदित्य ठाकरे
मला अनेक ठिकाणांहून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी बोलावलं होतं. पण, मी सगळ्यांना सांगितलं, माझा ओमदादा अर्ज भरायला जातो, मला तिथेच जायला लागेल, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले. तसेच, महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, ओमदादा जिगर का तुकडा.. असे म्हणत आदित्य ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांचा फॉर्म भरण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याचं सांगितले.यावेळी, आमदार रोहित पवार हेही व्यासपीठावर दिसून आले. त्यांनीही ओमराजे आणि आदित्य ठाकरेंचे हात उंचावत उपस्थितांना अभिवादन केलं. तर, आदित्य ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच माजी मंत्री अमित देशमुख यांचीही व्यासपीठावर एंट्री झाली. त्यावेळी, आदित्य ठाकरेंनी त्यांना जादू की झप्पी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)