Shiv Sena Vs BJP : शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम तर भाजपचं रक्तदान शिबीर; ठाण्यात शिवसेना-भाजपच्या परस्परविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
Shiv Sena Vs BJP : एका बाजूला 'देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अशा घोषणा तर दुसऱ्या बाजूला 'एडी सरकार हाय हाय, आणि 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा ऐकून ठाणेकर आज चक्रावून गेले.
Shiv Sena vs BJP : एका बाजूला 'देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, अशा घोषणा तर दुसऱ्या बाजूला 'एडी सरकार हाय हाय, आणि 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा ऐकून ठाणेकर आज चक्रावून गेले. याचे कारण म्हणजे आज ठाणे (Thane) स्थानकाबाहेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे शिवसेना (Shiv Sena) जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याने शिंदे सरकार विरोधात स्वाक्षरी मोहीम आयोजित केली होती. तर त्याच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजप (BJP) पदाधिकारी सारंग मेढेकर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते तर महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी मोदी यांच्या गौरवार्थ बॅनर लावला होता. या दोन्ही आयोजकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी आपापला कार्यक्रम आयोजित केल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. यावेळी काही काळासाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
उद्धव ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे यांनी स्वाक्षरी मोहीमेला हजेरी लावून सध्याचे सरकार आणि भाजपवर जबरदस्त टीका केली. तर रक्तदान शिबिर आणि बॅनरच्या उद्घाटनासाठी भाजप नेते कृपाशंकर सिंह आणि आमदार निरंजन डावखरे आले होते. त्यांनी देखील, उद्धाव ठाकरे गटाला अशी घोषणाबाजी करण्यावाचून काहीही काम उरले नाही, अशी टीका केली. मात्र काही काळासाठी दोन्ही बाजूने तुफान घोषणाबाजी केली गेली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना आवरले. काही काळाने वातावरण थंड झाले.
मोदींचा 72 वा वाढदिवस, महाराष्ट्रात 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'
आज (17 सप्टेंबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 72 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशातील विविध राज्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा' आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. या पंधरवड्याच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.