Kiran Mane: बाळासाहेबांची जागा मिमिक्री करणाऱ्याला घेता येणार नाही, एका जागेसाठीची लाचारी पाहून उद्धव ठाकरे योग्यच असल्याचं पटतंय: किरण माने
Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे भाजपसोबत लोकसभेची निवडणूक लढवतील. त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाऊ शकते.
![Kiran Mane: बाळासाहेबांची जागा मिमिक्री करणाऱ्याला घेता येणार नाही, एका जागेसाठीची लाचारी पाहून उद्धव ठाकरे योग्यच असल्याचं पटतंय: किरण माने Shiv Sena Thackeray Camp leader Kiran Mane slams MNS Raj Thackeray and BJP Kiran Mane: बाळासाहेबांची जागा मिमिक्री करणाऱ्याला घेता येणार नाही, एका जागेसाठीची लाचारी पाहून उद्धव ठाकरे योग्यच असल्याचं पटतंय: किरण माने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/25/5ae0e452285c5a9235d7c8b471a1161d1711382058322954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) महायुतीत समाविष्ट करुन निर्णायक चाल खेळल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांच्यासारखी फर्डा आणि आक्रमक भाषेत प्रतिस्पर्ध्यांची पिसं काढणारा नेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांविरोधात प्रभावी ठरु शकतो, याची भाजपला पुरेपूर जाण आहे. आजवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना साथीला घेऊन जे साधता आले नाही, ती गोष्ट राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी साधता येऊ शकते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रभावी भाषणांमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण पालटू शकते आणि ठाकरे-पवार यांना असलेली सहानुभूती कमी करता येऊ शकते, असे भाजपचे राजकीय गणित असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. राज ठाकरे हे भाजपसोबत गेले तरी भाजपला त्याचा फायदा होणार नाही. राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची सर नाही. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या एका जागेसाठी ज्याप्रकारे लाचारी पत्कारली आहे, त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भुतकाळात घेतलेला निर्णय किती योग्य होता, हे आता पटत असल्याचे किरण माने यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता किरण माने यांच्या टीकेला आता मनसे आणि भाजपच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
किरण मानेंनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'कॉपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.
समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.
उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव 'कॅश' करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.
आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.'....तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरुन' त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.
बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.
आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.
आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय. कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.
उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'काॅपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला.
— Kiran Mane (@kiranmane7777) March 25, 2024
समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो… pic.twitter.com/sMEw4R0zkw
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)