Sanjay Gaikwad: बुलढाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार; मतदारयाद्यांतल्या घोळावर सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर
Sanjay Gaikwad: जिल्हाधिकाऱ्यांना मी 4000 नावे दिली आहेत ज्यांची दोन ठिकाणी मतदार यादीत नावे आहेत. मात्र त्यावर जिल्हाधिकारी कारवाई करत नाहीत, असा दावाही संजय गायकवाड यांनी केला आहे.

Sanjay Gaikwad: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत (Voter List) असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे, तसेच स्थानांतरित अधिकाऱ्यांची नावे देखील अद्याप यादीत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, निवडणूक आयोग (Election Commission) बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Sanjay Gaikwad: आमदार गायकवाडांचे आरोप काय आहेत?
"बुलढाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखाहून अधिक बोगस नावे मतदार यादीत आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षे झाली असतानाही त्यांची नावे यादीत कायम आहेत. पंधरा वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही अद्याप मतदार यादीत आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार अशा मतदारांची यादी दिली आहे, ज्यांची नावे दोन ठिकाणी आहेत. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात सांगितले असता, त्यांनी बोगस नावे काढू नका, अशी भूमिका घेतली, असे दावा संजय गायकवाड यांनी केलाय.
Sanjay Gaikwad: दुहेरी नोंदणीचा प्रकारही समोर
गायकवाड यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, अनेक मतदार ग्रामीण भागात राहतात, मात्र शहरी भागातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी आपले नाव तिथे नोंदवतात. अशा मतदारांकडे दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे ते दुहेरी मतदान करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.
Sanjay Gaikwad: बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमदार गायकवाड यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की:
राज्यात तिन्ही पक्षांची (शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी – अजित गट) महायुती व्हावी अशी सर्वच नेत्यांची इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल स्पष्ट आहे, मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Gaikwad on Sanjay Raut: संजय राऊतांवर टीका
गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हटले की, "संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचं काम करत आहेत," असा हल्लाबोल त्यांनी केलाय. उद्धव ठाकरे आणि आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसला ते चालणार नाही, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. एका मतदारांपर्यंत तीन विविध पक्षांच्या भूमिका गेल्या तर ते मतदाराला पटत नसतं, असे देखील संजय गायकवाड म्हणाले.
आणखी वाचा
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार, 'सन्नाटा'वरुन राज ठाकरेंनाही टोला
























