(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवतीर्थ नाकारलं तर कोर्टात, ताणल्यास थेट मैदानात; शिवसेना आक्रमक
Dasara Melava : शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.
Dasara Melava : शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना (Shiv Sena) कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.
शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार, यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. या निर्णयाची वाट शिंदे गट आणि ठाकरे गट पाहत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती आहे. मात्र यामध्ये शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानाचा विचार शिवसेना करणार नाही
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आले आहेत. पहिला अर्ज शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याने शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. मात्र मुंबई महापालिका हे प्रकरण ताणत असून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.
बीकेसीतील मैदान शिंदे गटाला
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज 'एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांचा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारल्यास शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झालं आहे.
दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान रिकामं राहणार?
शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेबरोबरच शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र शिवतीर्थ कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्याचा पर्याय शिंदे गटापुढे असणार आहे, तर शिवसेनेची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या