Sharad Pawar: शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीसाठी चक्रव्यूह रचायला सुरुवात; खडा न खडा माहिती काढा, पदाधिकाऱ्यांना धाडला सांगावा
Maharashtra Politics: शरद पवार हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघांचा आढावा घेऊन शरद पवार गटाचे उमेदवार निश्चित केले जातील. शरद पवार विधानसभेच्या किती जागांवर दावा सांगणार?
मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election 2024) चक्रव्यूह रचायला सुरुवात केली आहे. त्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा सांगावा धाडला आहे. येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहिती शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शरद पवार गट विधानसभेच्या किती जागांवर दावा सांगणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तसेच मविआतील घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस हे पक्ष लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहितीही शरद पवार यांनी मागवून घेतली आहे. पुढील आठवड्यात मतदार संघनिहाय माहिती आल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडून 288 जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी आपली जमिनीवरील सर्व यंत्रणा कामाला लावून विधानसभा मतदारसंघांच्या जागांबाबत इत्यंभूत माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. ही माहिती हाती आल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळाले होते. मविआने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले तर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. शरद पवार गटाचा 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट ही पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांचा अनुभव ही मविआसाठी जमेची बाजू ठरु शकते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन अचूक ठरले होते. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच मविआला 30 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकीत केले होते. हे भाकीत जवळपास खरे ठरले आहे. लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास शरद पवार यांनी मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता.
आणखी वाचा