Sharad Pawar: ते मुक्तपणे मतं मांडतात, अधूनमधून त्यांचं मतपरिवर्तन सुरुच असतं; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला
Maharashtra Politics: राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
सातारा: गेल्या काही वर्षांमधील अनुभव लक्षात घेता राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन हे अधुनमधून सुरुच असते, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली. ते सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार गटाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी शरद पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या मुद्द्याविषयी विचारणा करण्यात आली. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटले की, राज ठाकरे यांचं मतपरिवर्तन झाले आहे. अनेकदा अधुनमधून त्यांचं मतपरिवर्तन होत असते. गेल्या काही वर्षांमधील अनुभव पाहता, त्यावेळची स्थिती त्यांना योग्य होती, त्यासंबंधी ते मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. ते मांडत राहतील, असे शरद पवार यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक ही आम्ही आघाडी म्हणून लढवत आहोत. मविआच्या बैठकीत विशिष्ट कार्यक्रम आणि निश्चित उद्दिष्ट घेऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे, हे ठरले आहे. सगळयांनी त्यासाठी सामूहिक प्रयत्न करायते, हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. राज्यात केवळ शरद पवार गटच नव्हे तर सर्वच पुरोगामी लोकांना चांगले दिवस येताना दिसत आहेत. महाराष्ट्रात विरोधकांनी जी आघाडी केली आहे, त्याबद्दल सामान्य लोकांमध्ये आस्था आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच महाविकास आघाडी अजूनही वंचित बहुजन आघाडीशी युती करायला तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यातील लोकांना बदल हवाय: शरद पवार
राज्यात एकत्रितरित्या काम करण्याची भूमिका सर्वप्रथम साताऱ्यात घेण्यात आली. आजच्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. लोकांना परिवर्तन हवंय, त्याचं पहिलं पाऊल आज साताऱ्या टाकलं आहे. लोकांचा प्रतिसाद शशिकांत शिंदे यांना आहे, विजयाची खात्री असल्यामुळं त्यांच्यावर आरोप होत आहेत. माढा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ आहे. मात्र, आत त्या ठिकाणची स्थिती सुधारलेली दिसते, लोकं चार्टड प्लेनने नागपुरला जात आहेत, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली. एक एक जागा जिंकण्यासाठी आणि मोदींची एक एक जागा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
राज ठाकरे तुम्हाला कळले का? पत्रकारांचा थेट प्रश्न, शरद पवारांचं चार शब्दात उत्तर, पाहा व्हिडीओ