Sharad Pawar: निलेश लंके पुन्हा तुमच्यासोबत येणार आहेत का? शरद पवारांचं सस्पेन्स वाढवणारं उत्तर
Nilesh Lanke: अजित पवार गटाला पहिला धक्का! निलेश लंकेंनी साथ सोडली? निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांना, निलेश लंके तुमच्या पक्षात घरवापसी करणार आहेत, ते तुमच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला.
पुणे: अजित पवार गटाचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच सोमवारी सकाळपासून निलेश लंके हे आजच शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. पण निलेश लंके (Nilesh Lanke) यांना पुन्हा पक्षात घेणार की नाही, याबाबत कोणतेही ठोस भाष्य न करता याप्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला. शरद पवार हे सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांना, निलेश लंके तुमच्या पक्षात घरवापसी करणार आहेत, ते तुमच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंके यांना पुन्हा आमच्या पक्षात घेण्याची चर्चा एकदम कशी काय सुरु झाली? आमच्या पक्षात येण्यासाठी निलेश लंके यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी सांगितले.
अजित पवार गटात गेलेले आमदार पुन्हा तुमच्याकडे आले तर पक्षात घ्याल का?
निलेश लंके यांच्या घरवापसीच्या चर्चेच्या अनुषंगाने शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अजितदादा गटातील लोक परत आले तर त्यांना पक्षात घ्याल का, असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी म्हटले की, परत येण्यासाठी कोण आणि किती लोक इच्छूक आहेत, याची माहिती तुम्हीच मला द्या. मग विचार करु, असे पवारांनी म्हटले. पक्षातून गेलेले कितीजण तुमच्या संपर्कात आहेत, असे विचारले असता पवारांनी सांगितले की, आम्ही त्या उद्योगात नाही. तिकडे गेलेले असे अनेक लोक आहेत की,त्यांना जे काही सुरु आहे, ते योग्य वाटत नाही. आमच्यापासून दूर राहण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत, पण ते अस्वस्थही आहेत, असे सूचक भाष्य शरद पवार यांनी केले.
भाजपकडून सत्तेचा गैरवापर, शरद पवारांची टीका
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून केंद्रीय तपासयंत्रणांच्या सुरु असलेल्या गैरवापराविषयी भाष्य केले. आजपर्यंतच्या इतिहासात सत्तेचा असा गैरवापर कधीही झाला नाही. स्वत:च्या पक्षातील चूक करणाऱ्या लोकांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय अशी भूमिका आम्ही कधीही घेतली नव्हती, असे शरद पवारांनी म्हटले. तसेच आपल्याला येत्या-दोन तीन महिन्यांत तुरुंगात टाकले जाऊ शकते, या रोहित पवारांच्या वक्तव्यावरही शरद पवारांनी टिप्पणी केली. यापूर्वी आपण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांची उदाहरणं पाहिली आहे. त्यामुळे रोहित पवारांबाबत तशी कारवाई होऊ शकते. सरकारचा काही भरोसा नाही, असे शरद पवारांनी म्हटले.
आणखी वाचा
अजित पवार गटाला पहिला धक्का! निलेश लंकेंनी साथ सोडली, शरद पवार गटात करणार प्रवेश