(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar: तुम्हाला बारामतीत अडकवून ठेवण्याचा प्लॅन; शरद पवारांनी दिलं कार्यकर्त्यांच्या अंगात 100 हत्तींचं बळ भरणारं उत्तर
Sharad Pawar: महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना आम्ही एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्याशीही चर्चा सुरु आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानेही सहभागी व्हावं, ही इच्छा.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघाबाबत (Baramati Loksabha) भाष्य केले. बारामतीमधून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात उतरणार आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, लोकशाहीत कोणालाही निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यात चिंता काय करायची? एखादा नवीन उमेदवार येत असेल तर आनंद आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
तुम्हाला बारामतीत अडकवून ठेवण्याचा विरोधकांचा प्लॅन, शरद पवार म्हणाले...
यावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. विरोधकांनी तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात अडकवून ठेवण्याचा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. अशावेळी तुम्ही काय करणार, असे पवारांना विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना पवारांनी म्हटले की, मी आतापर्यंत एकूण 14 निवडणुका लढलोय. त्यापैकी 7 निवडणुका या लोकसभेच्या होत्या. या 14 निवडणुकांमध्ये मी कधीही अडकून पडलो नाही. मग आता हे काय करणार, असा टोला शरद पवारांनी महायुतीला लगावला.
बारामतीतील कार्यकर्ते आणि संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना शरद पवारांचं पाठबळ
शरद पवार यांनी आज बारामतीमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याबद्दल त्यांनी सांगितले की, आज बैठकीला बारामतीच्या प्रत्येक मतदारसंघातील कमीत कमी 150 ते 200 कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एक लक्षात आले की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांना पर्याय हवा आहे. राजकीय पक्ष म्हणून त्याची पूर्तता करणे ही आमची जबाबदारी आहे. बारामतीमधील अनेकांनी सांगितले की, त्यांना काहीजणांकडून दमदाटीचे फोन येत आहेत. काही निमशासकीय कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना तुम्हाला नोकरीला मुकावं लागेल, अशा धमक्या दिल्या जात आहेत. असं प्रत्यक्षात घडत असेल तर आम्ही त्याच्या खोलात जाऊ. तुम्हाला कोणी दमदाटी करण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी उभे राहू. तुम्ही चिंता करु नका. तुम्ही एकटे नाहीत, असे शरद पवारांनी सांगितले.
आणखी वाचा
शिंदे-फडणवीसांचं वक्तव्य पोरकटपणाचं; जरांगेंना पाठबळ देण्याच्या आरोपांवरुन शरद पवारांनी फटकारलं