बारामतीत पवार कुटुंब एकत्र; राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचं अनोखं स्वागत, राजकीय बॅनर व्हायरल
देशाच्या राजकारणात एकट्या बारामतीचे तीन खासदार आहेत, तर राज्याच्या विधानसभेत दोन आमदार हे बारामतीचेच आहेत
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीत आता पवार कुटुंबातच दोन गट पडले आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वीच बारामतीमधील राजकारण दोन गटांत विभागल्याचं पाहायला मिळालं. मात्र, बारामतीकरांना काकांच्या पारड्यात वजन टाकत लोकसभा निवडणुकीत बारामतीकर हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजुने असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर, आता आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातच, यंदाच्या पंढरीतील आषाढी वारी (Pandharichi wari) उत्सवातही राजकीय रंग पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बारामती (Baramati) ही राजकारणाची पंढरी असल्याचा दावा करत बारामतीमध्ये फलक झळकावले आहेत.
देशाच्या राजकारणात एकट्या बारामतीचे तीन खासदार आहेत, तर राज्याच्या विधानसभेत दोन आमदार हे बारामतीचेच आहेत. तसेच, राज्याचं राजकारण हे नेहमीच बारामतीच्या अवतीभोवती म्हणजे शरद पवारांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे, बारामतीच्या राजकीय घडामोडी देशात चर्चेत असतात. आता, पवार कुटुंबात राजकीय फूट पडल्यानंतर येथील स्थानिक राजकारण बदललं आहे. मात्र, वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर झळकला आहे. सध्या सोशल मीडियासह बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा आहे.
राजकारण्यांच्या पंढरीत तुमचं स्वागत
राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारे एकच असल्यासारखे आहेत. बारामतीमध्ये झळलेल्या बॅनरवरुन असाच काहीसा संदेश देण्यात आला आहे. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात हा फलक उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत.. असं आशय या फलकावर आहे. वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रितपणे झळकले आहेत. त्यामध्ये, शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या फोटोची एक लाईन, तर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या फोटोची एक लाईन दिसून येत आहे. त्यासोबतच, सर्वात वरती बा विठ्ठलाचा फोटो दिसून येत आहे. 8 नं. बॉयज... ने हा बॅनर उभारला असून ना सन्मान का मोह, ना अपमान का भय.. असेही वाक्य बॅनरवर दिसून येत आहे.
पवार कुटुंब एकत्र
सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील परिस्थिती बदलली असून पवार कुटुंबात दोन गट पडले आहेत. त्यामुळे, शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना आहे. मात्र, या फोटोच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आले, असे म्हटले तर वावगं ठरणर नाही. दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत पालखी विसावल्यावर समाज आरतीसाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.