मोठी बातमी : माझा 'तो' प्लॅन यशस्वी झाला, ' एबीपी माझा'च्या मुलाखतीत शरद पवारांनी सगळंच सांगितलं!
Sharad Pawar Exclusive Interview : मला शिवसेनेसोबत जायचं होतं, सहकाऱ्यांना भाजपसोबत जायचं होतं, पण माझा प्लॅन यशस्वी झाला असं शरद पवारांनी सांगितलं.
मुंबई: सन 2014 साली आम्ही भाजपला पाठिंबा घ्यायचा निर्णय जाहीर केला, पण पाठिंबा दिला नाही, कारण तो राजकीय स्ट्रॅटेजीचा भाग होता असं शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पष्टच सांगितलं. त्यानंतर 2017 साली आम्हाला शिवसेनेला भाजपपासून दूर करून ठाकरेंसोबत आघाडी करायची होती, नंतर आपला प्लॅन यशस्वी झाला असंही पवार म्हणाले. 'एबीपी माझा'सोबत बोलताना पवारांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं त्याची माहिती दिली.
शरद पवार म्हणाले की, "2017 साली आम्हाला शिवसेनेला भाजपसोबत दूर करून उद्धव ठाकरेंसोबत जायचं होतं, तो माझा प्लॅन यशस्वी झाला. आता जसं मी आणि उद्धव ठाकरे एकत्रित भूमिका मांडतो ते मला हवं होतं. भाजपसोबत जायचा माझा प्लॅन नव्हता, माझ्या सहकाऱ्यांचा तो निर्णय होता. पण मी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहचलो नव्हतो. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तिक निर्णय आहेत की नाही? जेव्हा प्रत्यक्षात निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला."
अजित पवारांनी आपल्यावर आरोप केले, तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास बांधील नाही असं शरद पवारांनी सांगितलं.
अजित पवारांची ती भूमिका आवडली नाही
पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवारांची संमती होती असं या आधी अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 2019 साली भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांना माझा मान्यता होती तर तीन दिवसांनी राजीनामा का दिला? मला त्यांची ती भूमिका आवडलेली नव्हती. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं, पण सत्तेत जायचं होतं. लोकशाहीमध्ये सर्वांना सत्तेत सहभागी होत येत नाही. अजित पवार हे 2014 साली विरोधात होतेच ना?
भाजप सोडून आमच्या सोबत कोण परत येणार असेल तर आम्हाला विचार करायला हरकत नाही, पण भाजपच्या सोबत कधीही जाणार नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळाला तर आनंदच
अजित पवारांच्या पक्षानं यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिलं आहे, त्यावर तुमचं मत काय आहे असं विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण याचं कार्य महान आहे. त्यांनी राज्यच नव्हे तर देशपातळीवर काम केलं आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्नांची मागणी केली याचं मला समाधान आहे.
अशी कुठली ठिणगी पडली ज्यामुळे घर फुटलं?
आम्ही सगळे एकाच विचारानं राजकारण करत आलो आहोत. आतापर्यंत आम्ही भाजपच्या विरोधात निवडणूक लढलो. आता एका व्यक्तीने आमच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतली. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी निवडणूक झाली नसती तर आनंदच झाला असता, पण आता एकाने वेगळी भूमिका घेतली आहे. राजकारणात जर कुणी वेगळी भूमिका घेतली तर आम्ही त्यावर काय करू शकतो?