Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Bhandara News: तुमसर बाजार समितीवर भाजप - राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्चस्व. निवडणुकीत १८ पैकी ११ संचालक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाजपच्या माजी आमदारांच्या पॅनलचा दारुण पराभव
भंडारा: बहुप्रतिक्षित तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Camp) संयुक्त बळीराजा जनहित पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन करताना त्यांचे एकूण 10 संचालक निवडून आणलेत. 18 संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.
तुमसर ही भंडारा जिल्ह्यातील महत्वाची कृषी उत्पन्न बाजार (Tumsar Agricultural Produce Market Committee) समिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजू कारेमोरे यांच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे तीन तर, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जय किसान महाविकास पॅनलचे चार आणि अपक्ष एक असे 18 संचालक निवडून आले आहेत.
विदर्भातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मागील अडीच वर्षापासून रखडल्या होत्या. उच्च न्यायालयाने (high court) तीन महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाकोळली गेली होती.
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई असली तरी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नेते एकत्र आले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंजक झाली होती. अखेर आज तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शरद पवार गट आणि भाजपने चमकदार कामगिरी केली आहे.
आणखी वाचा