Sharad Pawar and Dattatray Bharne : 'अरे जरा जपून, तुला..', 5 महिन्यांपूर्वी शरद पवारांच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य खरे होणार? हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने काय साध्य होणार?
Sharad Pawar and Dattatray Bharne : माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून शरद पवारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात मोठी खेळी केलीये.
Sharad Pawar and Dattatray Bharne, इंदापूर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवून 8 जागांवर निर्वावाद विजय मिळवला. तर साताऱ्याचा जागेवर पिपाणीने घोटाळा केला, असा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, लोकसभेत मिळवलेल्या 80 टक्क्यांच्या स्ट्राईक रेटनंतर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांनी रांगा लावल्या आहेत. गुरुवारी शरद पवार सांगलीत होते, तेव्हा एक भाजप नेता भेटीसाठी आला अन् थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान भाजपला आज सर्वांत मोठा धक्का बसलाय. कारण राज्याचे बडे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भुतकाळात मंत्रिपदं भूषवलेल्या हर्षवर्धन पाटलांनी आज (दि.4) भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या इशाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून दत्तात्रय भरणेंविरोधात तगडा डाव टाकल्याचीही चर्चा आहे.
लोकसभेवेळी शरद पवारांनी भरणेंना कोणता इशारा दिला होता?
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी इंदापुरात सभा घेत आमदार भरणेंना इशारा दिला होता. शरद म्हणाले होते की,"एक आहेत, त्यांना मी आमदार देखील केलं. त्यांनाही मंत्रीपदही दिले. मात्र, काही लोक माझ्याकडे आले. हे लोक इंदापुरात द्राक्षांची शेती करतात. त्यांना लोकांनी मला सांगितलं की, आम्हाला पूर्णपणे तुमच्या पक्षाला सहकार्य करायचं आहे. मात्र, आम्हाला सांगण्यात आलं की, तुमच्या पक्षाला सहकार्य केलं तर तुमच्या शेतीला मिळणारं पाणी बंद करु." त्यानंतर पुढे बोलताना शरद पवार भरणेंना उद्देशून म्हणाले होते की, "शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही. मी त्यांना एवढचं सांगू शकतो की, अरे जरा जपून , तुला सरळ करायला वेळ लागणार नाही."
भरणेंविरोधातील शरद पवारांची खेळी यशस्वी होणार ?
शरद पवारांनी लोकसभेवेळी केलेले हे भाषण व्हायरल देखील झालं होतं. आता शरद पवारांनी थेट इंदापुरात दत्तात्रय भरणेंविरोधात ट्रॅप रचलाय. भाजपमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत शरद पवार आता भरणेंना पराभूत करण्यासाठी ताकद लावत आहेत. हर्षवर्धन पाटलांना गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र, त्यावेळी दत्तात्रय भरणे शरद पवारांकडून लढत होते. आता भरणेंना शरद पवारांच्या विचारांच्या विरोधात निवडणूक लढायची आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील राज्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 1952 सालापासून हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबियांचा मतदारसंघात जनसंपर्क आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही केवळ 2000 मतांनी हर्षवर्धन पाटलांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यातच आता दत्तात्रय भरणेंवर शरद पवारांना सोडल्याचा ठपका असणार आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीतही इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे शरद पवारांनी भरणेंविरोधात खेळलेली खेळी यशस्वी ठरणार का? हे येणारा काळच सांगणार आहे.
गेल्या दोन निवडणुकीतील गणित काय ?
2014 साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढली होती. त्यावेळी इंदापुरात राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणेंना मैदानात उतरवण्यात आले होते. तर काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटालांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंना 108400 मतं मिळाली होती तर हर्षवर्धन पाटलांना 94227 मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा जवळपास 16 हजार मतांनी पराभव झाला होता.
2019 च्या निवडणुकीत काय झालं?
2014 साली आघाडी न करता लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 2019 च्या निवडणुकीत आघाडी केली. मात्र, इंदापूरची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळण्याची अडचण झाली. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांनी महायुतीकडून निवडणूक लढवली तर भरणेंनी शरद पवारांच्या राष्ट्र्वादीकडून लढवली. यावेळी दत्तात्रय भरणेंना 1 लाख 14 हजार मत मिळाली तर हर्षवर्धन पाटलांना 1 लाख 11 हजार 800 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जवळपास दोन हजार मतांनी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
BDD Chawl : बीडीडी चाळीला देण्यात आलेलं 'शरद पवार नगर' नाव बदललं, महायुती सरकारचा मोठा निर्णय