Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदासभाईंनी केलेल्या आरोपात तथ्य, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वक्तव्यावर शहाजीबापूंकडून पाठराखण; म्हणाले, 'त्या काळात अनेक ठिकाणी...'
Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रामदास कदम यांनी "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले," असा आरोप केला होता. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या प्रकरणावर आता माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रतिक्रिया देत रामदास कदम यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. "त्या काळात मी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो, मात्र ग्रामीण भागात बाळासाहेबांच्या निधनासंबंधी अशाच चर्चा सुरू होत्या," असं स्पष्ट करत शहाजी बापूंनी रामदास कदमांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला आहे.
Shahaji Bapu Patil on Ramdas Kadam: 'त्या' काळात अनेक ठिकाणी चर्चा
माढा तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आले असताना शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "त्या काळात अनेक ठिकाणी चर्चा होती की, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन नेमकं कधी झाले? दोन दिवस घोषणा का केली जात नाही? काहींनी अंत्यविधीच्या तयारीसंदर्भात अंदाज मांडले, तर काहींनी वेगळ्याच शक्यता बोलून दाखवल्या. रामदास कदम हे शिवसेनेचे जुने नेते असून त्यांनी उपस्थित केलेल्या शंकेमध्ये तथ्य असू शकेल," असे त्यांनी म्हटले.
Shahaji Bapu Patil on Anil Parab: अनिल परबांच्या आरोपात तथ्य नाही
1993 साली रामदास कदम यांची पत्नी ज्योती कदम यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. याबाबत विचारले असता शहाजी बापू म्हणाले की, आरोपाला काहीतरी आरोप करून जोडायचे म्हणून परब यांनी कदम यांच्यावर हा आरोपाचा पदर जोडला आहे. मात्र, रामदास भाई यांच्या पत्नीने माध्यमांसमोर येऊन वास्तव सांगितल्याने परब यांच्या आरोपात काही तथ्य नाही, असे त्यांनी म्हटले.
Shahaji Bapu Patil on Elections: महायुती एकत्र निवडणूक लढणार
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच संदर्भात बोलताना शहाजी बापूंनी स्पष्ट केलं की, "महायुती म्हणून शिवसेना (शिंदे गट), भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
























