Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य बुमरँग, शिंदे गटातील सगळ्यांनी हात वर केले, आता रामदास कदमांची सारवासारव
Ramdas Kadam : बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता.

Ramdas Kadam : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2025) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आरोपांची राजकीय किंमत आता शिंदे गटाला चुकवावी लागण्याची चिन्हं आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. मात्र, या वक्तव्यामुळेच शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Faction) अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. त्यातच शिंदे गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी हात वर केल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला. यामुळे शिंदेसेनेचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. शिंदेसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही याची झळ बसू शक्यता वर्तवली जात आहे.
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : रामदास कदमांची सारवासारव
या वादळानंतर रामदास कदम यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट केली. "बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत", असे त्यांनी म्हटले. तसेच, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी दोन दिवस पार्थिव ठेवले, असे उद्धव ठाकरेंनी सांगावे. माझे काहीच म्हणणे नाही. हे जे तुम्ही आज सांगत आहात तेच महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावे. हेच माझे म्हणणे आहे. लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही दोन दिवस काढले असे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
Ramdas Kadam on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे का गप्प आहेत?
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवलं? हा संशय मी व्यक्त केला आहे. त्यात गैर काय? माझी मागणी योग्य असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते. अनिल परब माहिती देत आहेत. पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत? मी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचं दैवत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला त्यांनीच सांगितलं की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत, असे देखील रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
View this post on Instagram
Ramdas Kadam Statement : रामदास कदमांच्या विधानाने शिंदेसेना अडचणीत?
रामदास कदम यांच्या एका विधानामुळे शिंदेसेना अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्यापासून ते गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर या सर्वच नेत्यांच्या नैतिकतेवर कदम यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे. या सर्व नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मंत्रीपद भूषवले. मग जर त्यांची निष्ठा खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांशी होती, तर त्यांनी तो कथित प्रकार का सहन केला? आणि तो पाहून ते गप्प का राहिले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. रामदास कदम यांनी जणू उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या आरोपांचं टायमिंग पूर्णपणे चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
























