कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Amol Kirtikar: काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक नेते ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकरांना ईडीनं धाडलेलं हे दुसरं समन्स आहे.
Amol Kirtikar ED Inquiry: मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Gajanan Kirtikar) यांना ईडीनं (ED) दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. ईडीनं समन्स (ED Summons) पाठवून 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमोल किर्तीकरांना दिले आहेत. दरम्यान, कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी किर्तिकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती.
काही दिवसांपूर्वी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक नेते ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकरांना ईडीनं धाडलेलं हे दुसरं समन्स आहे. गेल्या चौकशीला अमोल किर्तीकर चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे कीर्तिकर गैरहजर असल्याची माहिती त्यावेळी वकील दिलीप साटलेंनी दिली होती. ईडीनं अत्यंत शॉर्ट नोटीस देउन समन्स दिल्यानं, हजर होण्यात अडचण होत असल्याचं कीर्तीकरांनी पत्रात नमूद केलं होतं. तसेच, वकिलांकडून पत्र देऊन कीर्तीकर हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितल्याचं वकीलांनी सांगितलं होतं.
अमोल गजानन किर्तीकर म्हणजे, शिवसेनेचे आणि सध्या शिंदे गटात असलेले खासदार. अमोल यांनी आपला राजकीय प्रवास आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतून सुरू केला. सध्या अमोल कीर्तीकर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून तिकीट देण्यात आलं आहे.
निवडणुकांच्या तोंडावर देशभरात ED कडून कारवायांचा सपाटा
लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून देशभरात निवडणूक प्रचारांची धामधूम दिसत आहे. अशातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर देशभरात ईडीकडून कारवायांचा सपाटा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून होत असलेल्या कारवायांमुळे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. सध्या ते ईडी कोठडीत आहे. अशातच आता लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले अमोल किर्तीकर ईडीच्या रडारवर आल्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
अमोल कीर्तिकर हे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. या मतदारसंघात अमोल कीर्तीकरांची मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचं समन्स आल्यानं ठाकरे गटाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रकरण नेमकं काय?
मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आलं होतं, असं मनपाचं म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.