Sanjay Raut On Santosh Dhuri: संतोष धुरी राज ठाकरेंची साथ सोडून भाजपात जाणार; संजय राऊत म्हणाले, मोगलांच्या तंबूत...
Sanjay Raut On Santosh Dhuri: मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले वरळीमधील संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sanjay Raut On Santosh Dhuri: मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले वरळीमधील संतोष धुरी (Santosh Dhuri) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 194 वार्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं संतोष धुरी नाराज होते. 194 वॉर्डमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संतोष धुरी भाजपात जाणार असल्याने ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी (BMC Election 2026) हा मनसेला धक्का असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, संतोष धुरीच्या भाजपाप्रवेशावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले? (Sanjay Raut On Santosh Dhuri)
नाराजी सगळ्यात पक्षात आहे. तुम्ही कालपर्यंत निष्ठावंतपर्यंत म्हणून मिरवत होतात, आणि तिकीट मिळाली नाही, तर लगेच पक्षांतर करताय. मराठी लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू म्हणून ज्यांना घोषित केलेय, त्या मोगलांच्या तंबूत तुम्ही प्रवेश करताय, तुम्ही औरंगजेबच्या तंबूत जाताय, कारण तो गुजरातलाच जन्माला आला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यामुळे मराठी कार्यकर्ते आहेत, त्यांनी थोडा विचार करायला हवा. आमच्या पक्षातून काही लोक भाजपात गेले, मनसेचे गेले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचेही गेले. भाजपाला काय सोनं लागलंय समजत नाही. तुम्ही किती जणांना पैसे देणार आहात, तुमच्याकडे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
मी राज ठाकरेंशी कोणती चर्चा केलेली नाही- संतोष धुरी (MNS Santosh Dhuri)
मला महानगरपालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज असण्याचा प्रश्न नाही. मी गेल्या दोन दिवसांत भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझी आगामी राजकीय दिशा मी आज दुपारी स्पष्ट करेन. मनसेतील कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी राज ठाकरे यांच्याशीही कोणती चर्चा केलेली नाही. मी दोन दिवसांत हा निर्णय घेतला आहे. आज मी घराबाहेर पडलो तेव्हा संदीप देशपांडे मला मित्रासारखे नेहमीप्रमाणे भेटले. यापुढे संदीप देशपांडे यांनी मैत्री ठेवली तर आमची मैत्री राहील. मी माझा निर्णय घेताना कोणाशीही चर्चा केलेली नाही, असे संतोष धुरी यांनी सांगितले.
कोण आहेत संतोष धुरी? (Who Is Santosh Dhuri)
संतोष धुरी हे राज ठाकरेंच्या मनसेचे माजी नगरसेवक होते. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांची घट्ट मैत्री आहे. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रीय होते. मागील मनपा निवडणुकीत ते मनसेकडून निवडणूक लढले होते. परंतु त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी ठाकरे बंधू युती होत आहे. त्यात वार्ड क्रमांक 194 मधून संतोष धुरी निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यात संदीप देशपांडे यांनीही संतोष धुरी यांच्या तिकीटासाठी प्रयत्न केला. मात्र जागावाटपात ही जागा उद्धवसेनेला सुटली. त्यामुळे देशपांडे आणि संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
























