विवाहित महिलेसोबत लग्न, शारीरिक संबंध आणि धोका, संजय शिरसाट यांच्या लेकावर गंभीर आरोप
Sanjay Shirsat son Sindhant Shirsat : विवाहित महिलेने मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Shirsat son Sindhant Shirsat : राज्याचे सध्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Sindhant Shirsat) यांच्यावर एका विवाहित महिलेकडून खळबळजक आरोप करण्यात आले आहेत. या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
विवाहित महिलेने दिलेल्या नोटीसमध्ये काय काय?
सिद्धांत शिरसाट यांची ओळख 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आमच्यात रिलेशनशिपला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात आमच्या चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या. तसेच सिद्धांतने माझ्याबरोबर शारिरीक संबंध देखील ठेवले. सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं. धमक्या देऊन माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विवाहित महिलेकडून करण्यात आलाय.
लग्नानंतर सिद्धांतच्या वागण्यात बदल; महिलेचा आरोप
सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले असून त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे विवाहित महिलेने या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहेत. दरम्यान, लग्नच नाही तर सिद्धांत यांच्यासोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली होती. मात्र, त्यांनी जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला, असंही विवाहित महिलेने म्हटलं आहे.
पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करुन टाकेन
सिद्धांतशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला. त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर येथील घरी नेण्यास नकार दिला आणि चेंबूरमधील घरात राहण्यास भाग पाडले. यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. “पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करुन टाकेन” अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलेने म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय. सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत ठोंबर यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.
हिलेची फसवणूक झाली असेल तर कारवाई झाली पाहिजे : अंबादास दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मंत्र्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल होऊन देखील दखल घेण्यात आली नाही. पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. वैयक्तिक जीवनात कोणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र किमान नात्यात तरी फसवणूक केली जाऊ नये. महिलेची फसवणूक झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्रीपदाचा गैरफायदा घेतला जात असेल अतिशय गंभीर बाब आहे.
सुषमा अंधारे यांच्याकडून संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी
सुषमा अंधारे म्हणाल्या, हे फारच गंभीर आहे. सत्ताधारीच महाराष्ट्रातील लेकी-बाळींवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अत्यंत अश्लाघ्य आहे. मला एक गोष्ट आठवते की, संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा मागण्यात भाजप आघाडीवर होती. भाजपच्या मंत्रिमंडळात आता संजय शिरसाट आहेत. शिरसाट सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर हे प्रकरण दाबू पाहातात. आता अशा संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का? संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का? हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवावं. शिरसाटांचा राजीनामा का घेतला जात नाही? त्यांना पायउतार करणार आहात की नाही? आम्ही राजीनाम्याची मागणी करतोय आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत.
इतर महत्त्वाच्या बातम्या























