Sanjay Raut : भाजपसोबत युती म्हणजे औरंगजेब - अफजल खानाशी हातमिळवणी : संजय राऊत
Sanjay Raut : भाजपसोबत जाणे म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाशी हातमिळवणी करण्यासारखं असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut, मुंबई : "संजय राऊतांची अमित शाहांशी भेट झाली हे सांगितलं जातय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटत आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं", असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही
संजय राऊत म्हणाले, स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. अशा अफवा पसरवून कोणी लढणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. कोणी सुपाऱ्या दिल्या याची बातमी आमच्याकडे आली आहे. आमचीही यंत्रणा आहे. एक वेगळं पेगासेस आमच्याकडे सुद्धा आहे. कोण कोणाकडून अफवा पसरवून घेतय, हे आमच्याकडे आहेत. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारांशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपशी हात मिळवणी करणे म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाशी हात मिळवणी करणे.
आम्हाला जे करायचंय ते आम्ही छाती ठोकपणे करु
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, जागा वाटपाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. अफवा पसरवल्या जातात, हा विषय वेगळा आहे. आमचं मन साफ आहे. आमचा विचार स्वच्छ आहे. आम्हाला जे करायचंय ते आम्ही छाती ठोकपणे करु. आमच्या 210 जागा संपूर्ण चर्चेअंती मोकळ्या झालेल्या आहेत. आमची भूमिका आहे, महाराष्ट्रात आम्ही एकत्र राहायला पाहिजेत. महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या लोकांचा पराभव आम्ही करणार आहोत.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतात, त्यांच्याविरोधात आमचा लढा
आमची लढाई महाराष्ट्राच्या शत्रूंविरोधात सुरु आहे. महाराष्ट्राला लुटणाऱ्यांविरोधात आम्ही लढत आहोत. शिवसेना अशा शक्तींविरोधात कधीही झुकणार नाही. ज्यांना देशाचं संविधान संपवायचं आहे. जे लोक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवतात, त्यांच्याविरोधात आमचा लढा आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या